Wheat Crop : तुमच्या शेतातील गहू पिवळा पडत आहे का? खतांचा डोस देऊनही अपेक्षित हिरवेगार पीक दिसत नाहीये? मग हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे. गव्हावर येणाऱ्या पिवळेपणाची खरी कारणे आणि त्यावर कमी खर्चात करता येणारे प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ही माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल..
सध्याच्या दिवसांत अनेक शेतकऱ्यांची एक कॉमन तक्रार असते – “गहू पेरला, खतं दिली, पण तरीही पीक पिवळं पडतंय.” आपण मनापासून मेहनत करतो, पेरणीच्या वेळी डीएपी (DAP), युरिया, पोटॅश देतो. काही शेतकरी तर दोन-दोन वेळा खतांचे डोस देतात. तरीही जेव्हा आपण शेतावर फेरफटका मारायला जातो, तेव्हा पिवळसर झालेलं रान बघून जीव तुटतो.
गहू पिवळा पडला की सरळ परिणाम त्याच्या वाढीवर होतो. पानांमध्ये प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) नीट होत नाही आणि साहजिकच त्याचा फटका पुढे उत्पन्नात बसतो. पण घाबरून जाऊ नका, यामागे काही ठराविक कारणे असतात आणि त्यावरचे उपायही तितकेच सोपे आहेत. चला तर मग, या समस्येच्या मुळाशी जाऊया..
येथे वाचा – यंदा मक्याचे दर वाढणार की पडणार? तांदूळ करतोय मक्याचा गेम..
गहू पिवळा का पडतो? (नेमकी कारणे)
गव्हाला पिवळेपणा येण्यामागे मुख्यत्वे दोन ते तीन कारणे असतात:
१. पाण्याचे नियोजन चुकणे:
पाणी कमी पडलं तरी पिकाला ताण (Stress) बसतो आणि पाणी जास्त झालं (साचून राहिलं) तरीही त्रास होतो. जमिनीत पाणी साचून राहिले की मुळांना हवा मिळत नाही, ती कुजतात आणि परिणामी पीक पिवळे पडते.
२. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता (Micronutrient Deficiency):
ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) तर देतो, पण पिकाला लागणारी ‘सूक्ष्म अन्नद्रव्ये’ द्यायला विसरतो. जेवणात जसं मिठाचं महत्त्व असतं, तसंच पिकाला झिंक, बोरॉन, फेरस यांसारख्या घटकांची गरज असते. ते न मिळाल्यास पीक पिवळे पडते.
येथे वाचा – घरीच बनवा 10:26:26 आणि DAP खत; पहा सोपा फॉर्मुला..
यावर उपाय काय?
जर तुमचा गहू ५०-६० दिवसांचा झाला असेल, तर आता जमिनीतून खत देऊन फारसा उपयोग होणार नाही. अशा वेळी फवारणी आणि काही खास उपायच कामी येतात.
उपाय १: मुळांची वाढ करा (ह्युमिक ॲसिडचा वापर)
जर पाणी साचल्यामुळे किंवा ताणामुळे मुळांचा विकास थांबला असेल, तर पीक अन्न उचलत नाही. पांढऱ्या मुळ्यांची वाढ होणे खूप गरजेचे आहे.
काय करावे? एकरी २ किलो ‘ह्युमिक ॲसिड’ (दाणेदार स्वरूपात) घ्या. ते वाळू किंवा रेतीमध्ये मिसळून संपूर्ण शेतात फेकून द्या. यामुळे पांढऱ्या मुळ्या झपाट्याने वाढतील आणि पीक जोमाने वाढू लागेल.
उपाय २: सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी
गव्हाचा पिवळेपणा घालवून त्याला पुन्हा हिरवेगार करण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट्सची फवारणी हा रामबाण उपाय आहे.
काय करावे? बाजारात अनेक चांगल्या कंपन्यांचे ‘मिक्स मायक्रोन्यूट्रियंट’ (Mix Micronutrient) लिक्विड स्वरूपात मिळतात. ज्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन इत्यादी घटक असतात.
प्रमाण: १५ लिटरच्या पंपासाठी ३० ते ४० मिली औषध घेऊन फवारणी करावी. (तुमच्या कृषी सेवा केंद्रात जे चांगल्या कंपनीचे उपलब्ध असेल ते वापरू शकता).
फायदा काय होईल?
जेव्हा तुम्ही हे उपाय कराल, तेव्हा काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल. पिवळेपणा जाऊन पीक काळोखी धरेल. फुटव्यांची संख्या वाढेल आणि पुढे येणारी ओंबी सुद्धा जोमदार असेल. विशेषतः ज्यांची पेरणी उशिरा झाली आहे, त्यांच्यासाठी हे उपाय खूप फायदेशीर ठरतील. शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मोठा फायदा होतो. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आमची बातमी इतर ग्रुपला नक्की शेअर करा..