Wheat Price Forecast : शेतकरी मित्रांनो, सध्या गव्हाच्या बाजारात मंदीचे वातावरण आहे. उत्पादन वाढले आहे, सरकारी गोदामांत साठा तुडुंब आहे आणि भाव हमीभावाच्या खाली आले आहेत. अशा वेळी नेमकं काय करावं? तेजीची वाट पहावी की माल विकावा? गव्हाच्या बाजाराचं हे गणित सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा!
गहू बाजारातली ‘मंदी’ आणि शेतकऱ्यांची चिंता
नमस्कार शेतकरी बांधवांनो.. सध्या बाजारात गव्हाच्या भावाची चर्चा जोरात आहे. तुम्ही जर मार्केटचा कल बघितला तर लक्षात येईल की गव्हाचे भाव सतत खाली येत आहेत. पण असं का होतंय? यामागे नेमकं कारण काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा ट्रेंड असाच राहणार की भविष्यात भाव वाढणार? ग्रीन इंडियाचे राहुल चौहान यांनी याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे, ती आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
१. सरकारी कोठारांमध्ये गव्हाचा महापूर..
गव्हाचे भाव पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ‘केंद्रीय पूल’मध्ये (Central Pool) असलेला गव्हाचा प्रचंड साठा. आकडेवारी पाहिली तर डोळे विस्फारतील:
सध्याचा साठा: १ डिसेंबर २०२५ ला हा साठा तब्बल २९७ लाख टन होता.
मागील वर्षी: याच काळात २०२४ मध्ये तो २०६ लाख टन आणि २०२३ मध्ये १९१ लाख टन होता.
थोडक्यात सांगायचं तर, गरजेपेक्षा (Buffer Norms – १७८ लाख टन) खूप जास्त गहू सरकारकडे ऑलरेडी पडलेला आहे. जेव्हा पुरवठा जास्त असतो, तेव्हा नैसर्गिकरित्या भाव कमी होतात.
येथे वाचा – कांदा पिकाला देशी दारूचा डोस; जबरदस्त जुगाड.. जबरदस्त रिझल्ट.. फक्त अशी करा फवारणी..
२. यावर्षी ‘बंपर’ उत्पादनाची शक्यता
दुसरीकडे, यावर्षी गव्हाची लागवडही जोरात झाली आहे. १२ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १७-१८ लाख हेक्टर जास्त क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी ११३० लाख टन उत्पादन झालं होतं, पण यावर्षी हवामान आणि लागवड पाहता हे उत्पादन ११८० ते ११९० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पीक जोमात आहे, त्यामुळे बाजारात आवक वाढणार हे नक्की.
३. गिऱ्हाईक कमी आणि माल जास्त?
सरकारने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी ‘ओएमएसएस’ (OMSS) योजनेअंतर्गत गव्हाचे टेंडर काढले होते. पण गंमत म्हणजे, व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. ४ लाख टनांपैकी फक्त ४०% गव्हाची उचल झाली, तीसुद्धा कमी भावाने. याचा सरळ अर्थ असा की, बाजारात गव्हाची टंचाई नाहीये, उलट माल मुबलक उपलब्ध आहे. आटा आणि मैद्यालाही सध्या म्हणावी तशी मागणी दिसत नाहीये.
येथे वाचा – शेळीपालनासाठी चक्क 75% अनुदान.. ‘पोकरा’ योजना.. मोबाईलवरून असा भरा अर्ज..
४. निर्यातीचं काय?
अनेक शेतकऱ्यांना वाटतं की निर्यात खुली झाली तर भाव वाढतील. पण तज्ज्ञांच्या मते, सध्या गव्हाची निर्यात खुली होण्याची शक्यता कमी आहे. सरकार कदाचित आटा किंवा मैद्याच्या निर्यातीवर विचार करेल, पण थेट गव्हाची निर्यात लगेच सुरू होणार नाही. त्यासाठी देशाला सलग २-३ वर्षे भरघोस उत्पादनाची गरज असते.
शेतकऱ्यांनी काय करावे? (तज्ज्ञांचा सल्ला)
सध्या उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या मार्केटमध्ये गव्हाचे भाव हमीभावापेक्षाही (MSP) खाली आले आहेत. नवीन पीक हातात आल्यावर भाव आणखी थोडे दबण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, जर तुमच्याकडे जुना स्टॉक असेल, तर तो काढून टाकणे (विकणे) फायद्याचे ठरेल. स्टॉक लिमिट आणि सरकारी विक्री धोरणामुळे नजीकच्या काळात मोठी तेजी येण्याची चिन्हे दिसत नाहीत. यंदा निसर्ग मेहेरबान आहे आणि गव्हाचं उत्पादन वाढतंय. पण यामुळेच बाजारभाव दबावात आहेत. त्यामुळे बाजाराचा अंदाज घेऊनच आपल्या मालाची विक्री करा.
येथे वाचा –एक फवारणी आणि 6 महिने गवताची सुट्टी.. तणांचा दुश्मन तणनाशक.. पहा कोणी वापरावे?