सध्या संपूर्ण राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. कुठे कांदा काढणी सुरू आहे, तर कुठे हळद आणि गहू सोंगण्याची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र, हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडणार तर नाही ना, अशी धाकधूक शेतकऱ्यांच्या मनात आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी नवा आणि अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त केला असून, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
२० एप्रिलपर्यंत हवामान कोरडे, उन्हाचा कडाका वाढणार
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, ११ एप्रिल ते २० एप्रिल या काळात राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. मात्र, या दरम्यान उन्हाचा चटका लक्षणीय वाढेल आणि तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना आवाहन: ज्या शेतकऱ्यांचा कांदा, हळद किंवा इतर शेतमाल अजूनही शेतात आहे, त्यांनी २० एप्रिलच्या आत सर्व काढणीची कामे उरकून घ्यावीत आणि आपला शेतमाल सुरक्षित जागी झाकून ठेवावा, असे आवाहन पंजाब डख यांनी केले आहे.
येथे वाचा – थांबलेले 6 हजार रुपये थेट खात्यात, पण ‘या’ शेतकऱ्यांचे हप्ते होणार बंद
२० ते २४ एप्रिल: राज्यावर अवकाळी पावसाचे सावट
२० एप्रिलनंतर मात्र राज्यातील हवामानात अचानक आणि मोठा बदल होणार आहे. २० ते २४ एप्रिल या कालावधीत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येथे वाचा – पीक कर्जाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुम्हाला किती कर्ज मिळणार!
कोणत्या भागात कसा असेल पावसाचा जोर?
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण: १९-२० एप्रिलपासूनच सातारा, कोल्हापूर, राधानगरी, पुणे, महाबळेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या भागात पावसाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईतही (कल्याण, डोंबिवली, ठाणे) अवकाळी पावसासह गारपीट पाहायला मिळू शकते.
विदर्भ: पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये २१ ते २४ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागेल. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे.
मराठवाडा: परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. २१ एप्रिलपासून या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेडच्या काही भागांत गारपीट होऊ शकते.
यंदाचा पावसाळा कसा असेल? (२०२६ मान्सून अंदाज)
अवकाळीच्या या संकटात पंजाब डख यांनी यंदाच्या मुख्य पावसाळ्याविषयी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचे चक्र बदलले असून, उन्हाळा आणि पावसाळा आता २२ दिवस पुढे सरकले आहेत. त्यामुळे जो पाऊस दरवर्षी ७ जूनला अपेक्षित असतो, तो यावर्षी २७ ते २८ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, यावर्षी कोणत्याही दुष्काळाचे सावट नाही. मान्सूनचा पाऊस सरासरीइतका आणि अतिशय उत्तम पडेल. तसेच परतीचा पाऊसही चांगली साथ देईल. डख यांच्या मते, २०२६ हे वर्ष शेतकऱ्यांना ‘मालामाल’ करणारे ठरणार असून, शेतीत पिकांचे भरघोस उत्पादन होईल.