गेल्या वर्षी आणि यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही मदत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे, याची सविस्तर माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ मधील नुकसान आणि मंजूर जिल्हे:
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले होते. याचा फटका १ लाख ८ हजार ५७४ शेतकऱ्यांना बसला. या नुकसानीपोटी सुमारे १२८ कोटी ८६ लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे.
• या जिल्ह्यांना मिळणार मदत: चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड आणि सिंधुदुर्ग.
येथे वाचा – तुमच्या जिल्ह्यात कोणत्या पिकाला पीकविमा मिळणार? पहा खरी माहिती
जानेवारी ते मार्च २०२६ मधील नुकसान आणि मंजूर जिल्हे:
नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या पावसामुळे एकूण १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये तब्बल २ लाख ३ हजार ८९० शेतकऱ्यांना फटका बसला. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्ष या फळबागांसह गहू, हरभरा, ज्वारी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले.
• या जिल्ह्यांचा आहे समावेश: लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड.
एप्रिल २०२६ मधील नुकसानीचे पंचनामे सुरू:
नुकत्याच एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसानेही राज्याला झोडपून काढले. यामध्ये राज्यातील १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या सुमारे १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीची देखील गांभीर्याने दखल घेतली असून, सध्या राज्यभर या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे.
येथे वाचा – २०२६ संपूर्ण हवामान अंदाज, पहा कसा असणार खरीप हंगाम
शासनाचे आवाहन:
ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे आणि प्रशासनाकडून ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशाच पात्र शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले पंचनामे झाले असल्याची खात्री करून घ्यावी. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.