Tractor Subsidy Scheme : नमस्कार शेतकरी बांधवांनो! तुम्ही महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणासाठी किंवा ट्रॅक्टर अवजारांसाठी अर्ज केला आहे का? जर तुमचे उत्तर ‘हो’ असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अनेकदा आपण अर्ज करतो आणि वाट पाहत बसतो, पण आता शासनाने एक डेडलाईन जाहीर केली आहे. थोडासा निष्काळजीपणा तुमचे नुकसान करू शकतो. नेमका काय अपडेट आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे, हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊया.
९ जानेवारी २०२६: ही तारीख लक्षात ठेवा
महाडीबीटी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांची निवड कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत (उदा. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर किंवा इतर अवजारे) झालेली आहे, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. तुम्हाला तुमची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ९ जानेवारी २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत कागदपत्रे अपलोड केली नाहीत, तर सिस्टिमद्वारे तुमचा अर्ज आपोआप रद्द (Auto-Cancel) केला जाईल. त्यामुळे, हाताशी आलेली संधी गमावू नका.
येथे वाचा – खरचं तुम्हाला पीक विमा मिळणार का? येथे पहा खरी माहिती
नेमकं प्रकरण काय आहे?
२०२० पासून अनेक शेतकऱ्यांचे अर्ज महाडीबीटीवर पडून होते. शासनाला हे तपासायचे आहे की, खरंच किती शेतकरी अजूनही हे अवजार घेण्यास इच्छुक आहेत आणि किती जणांनी फक्त अर्ज करून ठेवले आहेत. ज्यांना खरोखर लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपली तत्परता दाखवणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वीच वैयक्तिक शेततळ्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ची डेडलाईन देण्यात आली होती, आणि आता तीच पद्धत यांत्रिकीकरणासाठी वापरली जात आहे.
येथे वाचा – कर्जमाफीतून ‘हे’ शेतकरी बाहेर.. पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी
कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत?
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे (First Stage Documents) त्वरित अपलोड करावीत:
१. अवजाराचे कोटेशन (Quotation): तुम्ही ज्या डीलरकडून अवजार घेणार आहात, त्यांच्याकडून घेतलेले दरपत्रक.
२. टेस्ट रिपोर्ट (Test Report): त्या अवजाराचा शासनमान्य चाचणी अहवाल.
३. आधार कार्ड: ओळखीचा पुरावा.
४. जमिनीचा तपशील: ७/१२ उतारा इत्यादी.
पूर्वसंमती (Pre-consent) कधी मिळणार?
बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, “आम्ही कागदपत्रे अपलोड केली तरी पूर्वसंमती लगेच मिळणार का?” तर सध्याचे चित्र असे आहे की, निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्वसंमती दिली जाईल. सध्या जरी पूर्वसंमती थांबवली असली, तरी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. जोवर तुम्ही कागदपत्रे अपलोड करत नाही, तोवर तुम्ही ‘इच्छुक लाभार्थी’ म्हणून गणले जाणार नाही. एकदा का लक्षांक आणि निधी उपलब्ध झाला की, ज्यांची कागदपत्रे तयार आहेत, त्यांनाच प्राधान्याने पूर्वसंमती दिली जाईल.
येथे वाचा – मराठवाड्यात रंगीत कापसाची शेती.. चक्क लाल, हिरवा आणि निळा कापूस..
थोडक्यात सांगायचे तर… मित्रानो, ९ जानेवारी २०२६ ची वाट पाहू नका. शेवटच्या दिवशी साईट स्लो चालणे किंवा सर्व्हर डाऊन होणे अशा तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आजच जवळच्या सीएससी (CSC) सेंटरवर जा किंवा स्वतः मोबाईलवरून आपली कागदपत्रे अपलोड करा.