हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी राज्याच्या कृषी विभागाने सुधारित आणि वाढीव उत्पादकतेची नवी मर्यादा जाहीर केली आहे. मात्र, केंद्र सरकारने तब्बल १८ लाख ५० हजार टन खरेदी उद्दिष्टाला मंजुरी देऊन दीड महिना उलटला असतानाही खरेदीचा वेग समाधानकारक नाही. राज्यभरात अद्याप केवळ ६५ हजार टन सोयाबीनचीच खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी अनेक दिवसांपासून हमीभावाने खरेदीची हेक्टरी मर्यादा खूपच कमी असल्याची नाराजी व्यक्त करत होते. विशेषतः ऑगस्ट–सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे गंभीर नुकसान झाले. प्राथमिक कापणी परीक्षणांत उत्पादकता कमी आढळूनही अनेक शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सरासरीपेक्षा अधिक निघाले. त्यामुळे हाती उरलेले सोयाबीन बाजारात कमी भावात विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. यामुळेच उत्पादन मर्यादा वाढवण्याची मागणी जोर धरत होती.
आजचे सोयाबीन भाव येथे क्लिक करून पहा
दरम्यान, राज्याने केलेल्या मागणीनुसार केंद्राकडून १८.५० लाख टनांचे उद्दिष्ट मंजूर झाले असले तरी प्रत्यक्ष खरेदीची गती संथच आहे. सध्या राज्यातील ४६१ केंद्रांवर खरेदी सुरु असून, २.८८ लाख शेतकऱ्यांकडून फक्त ६५ हजार टन सोयाबीनच उचलले गेले आहे. खरेदी केंद्रांची संख्या आणि गती वाढल्याशिवाय नव्याने जाहीर झालेल्या वाढीव मर्यादेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाने जाहीर केलेल्या सुधारित उत्पादकतेनुसार हेक्टरी उत्पादकतेत ३ ते १० क्विंटलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आता अधिक प्रमाणात हमीभावाने विक्री करण्याची संधी मिळू शकते.
आजचे सोयाबीन भाव येथे क्लिक करून पहा
जिल्हानिहाय सुधारित उत्पादकता (क्विंटल/हेक्टर)
राज्यातील सोयाबीनची सुधारित हेक्टरी उत्पादकता जिल्हानिहाय मोठ्या फरकाने दिसून येते. कोल्हापूर (४३.२६ क्विंटल), सांगली (३८.४२), पुणे (३६.५०) आणि अहिल्यानगर (३३.२७) हे जिल्हे सर्वाधिक उत्पादनक्षम ठरले आहेत. सातारा (३१.१४), लातूर (२७.५३), नाशिक (२७.६७) आणि जळगाव (२७) या जिल्ह्यांमध्येही चांगली उत्पादकता नोंदली गेली आहे. बीड (२५.७७), धाराशिव (२३.२५), वाशीम (२२.९५), धुळे (२१.१०), अमरावती (२१.०५), छत्रपती संभाजीनगर व वर्धा (२१.34) याठिकाणी उत्पादन मध्यम स्तरावर आहे. तर नांदेड (१९.२८), बुलडाणा (१९.०५), हिंगोली (१८.३८), अकोला (१७.६७), चंद्रपूर (१७.२९), यवतमाळ (१६.३१), जालना (१६.०९), भंडारा (१४.७४), नंदूरबार (१४.९१) आणि नागपूर (१४.०३) या जिल्ह्यांत तुलनेने कमी उत्पादकता नोंदली गेली आहे. एकूण चित्र पाहता पश्चिम महाराष्ट्र आणि काही मराठवाडा जिल्ह्यांमध्ये उत्पादन जास्त, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत उत्पादन कमी असल्याचे स्पष्ट दिसते.