Pune 3000 Home Lottery : पुण्यात आपलं स्वतःचं, हक्काचं घर असावं हे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही मागच्या लॉटरीची वाट पाहिली होती का? आणि दुर्दैवाने त्यात तुमचा नंबर लागला नाही? तर आता नाराज होण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही! कारण, पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
पुन्हा एकदा संधी चालून आलीय!
नुकत्याच पार पडलेल्या म्हाडाच्या लॉटरीला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहून, म्हाडाने (MHADA) आता आणखी एक ‘धमाकेदार’ निर्णय घेतला आहे. मागच्या लॉटरीमध्ये तब्बल २ लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले होते, यावरूनच पुण्यात घरांची मागणी किती प्रचंड आहे हे स्पष्ट होतं. हीच गरज ओळखून येत्या मार्च महिन्यात पुणे म्हाडा मंडळातर्फे तब्बल ३००० परवडणाऱ्या घरांची नवीन लॉटरी काढली जाणार आहे.
नेमकं काय आहे या नवीन लॉटरीमध्ये?
म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यातील या लॉटरीमध्ये पुणे आणि आसपासच्या परिसरातील घरांचा समावेश असेल.
शिरूर: येथे ५७४ सदनिकांचे काम वेगाने सुरू आहे.
ताथवडे: येथील ७५० निवासी आणि अनिवासी गाळे लवकरच उपलब्ध होणार आहेत.
खराबवाडी: येथे १९४ व्यापारी गाळ्यांची संधी असेल.
याशिवाय म्हाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदर या भागांतही नवीन गृहप्रकल्प आकार घेत आहेत.
बिल्डरांच्या मनमानीला बसणार चाप!
अनेकदा खाजगी बिल्डर्स म्हाडाच्या २०% योजनेतील घरांसाठी ग्राहकांकडून जास्तीचे पैसे उकळतात, अशा तक्रारी आहेत. पण आता म्हाडाने याबाबत कडक भूमिका घेतली आहे. अशा प्रकारच्या वाढीव शुल्काला कात्री लावली जाणार असून, विजेत्यांना ५०% पार्किंग मिळणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता घर घेताना तुमची फसवणूक होणार नाही, याची काळजी म्हाडा घेणार आहे.
पारदर्शकता आणि सोपी प्रक्रिया
ही संपूर्ण प्रक्रिया मानवी हस्तक्षेप विरहित (Zero Human Intervention) आणि पूर्णपणे पारदर्शक असेल. विजेत्यांना ‘आयएचएलएमएस २.०’ (IHLMS 2.0) प्रणालीद्वारे घर स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची सोय असेल. तसेच कागदपत्रांची पूर्तता ऑनलाइन केल्यास घराचे देकारपत्र (Allotment Letter) त्वरित मिळेल.
आता उशीर नको.. तुम्ही जर घराच्या शोधात असाल, तर आतापासूनच तयारीला लागा. तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा आणि मार्च महिन्यातील या सुवर्णसंधीकडे डोळे लावून राहा.