Panjab Dakh 2026 Andaj : प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीसाठी महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट कायम राहणार असल्याचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, संपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर अधिक राहील आणि ही थंडी २० जानेवारीपर्यंत जाणवेल.
पूर्व व पश्चिम विदर्भ, दक्षिण व उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खान्देशसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी जाणवणार आहे. या काळात काही भागांमध्ये तुरळक ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. मात्र, या ढगांमुळे पावसाची शक्यता नसून, थंडीची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २०२६ च्या मान्सूनबाबत डख यांनी महत्त्वाचे आणि गंभीर संकेत दिले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, येत्या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून तो केवळ पिकांसाठी आवश्यक तेवढाच असेल. याचा परिणाम जलसाठ्यावर होणार असून, राज्यातील तलाव सुमारे ५० टक्क्यांपर्यंतच भरतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी १०० टक्के भरलेले जायकवाडी धरण २०२६ मध्ये फक्त ७० ते ८० टक्के क्षमतेपर्यंतच भरण्याची शक्यता आहे.
येथे वाचा – कांद्याला हेच खत वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा.. पहा उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन..!
या दिवशी गारपीट किंवा अवकाळी पावसाचा धोका
थंडी ओसरल्यानंतर लगेच पावसाची शक्यता नसली, तरी २२ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत राज्यात गारपीट किंवा अवकाळी पावसाचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही डख यांनी सांगितले. हा प्रकार दरवर्षी काही प्रमाणात दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांसाठी २०२६ च्या खरीप पेरणीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ६, ७ किंवा ८ जूनच्या आसपास राज्यात पहिला पाऊस पडू शकतो, जो सुरुवातीच्या शेती कामांसाठी उपयुक्त ठरेल. मात्र, मुख्य पेरण्या २१ जून ते २९ जून या कालावधीत होतील, तर १५ जुलैपर्यंत सर्व पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
येथे वाचा – लाखोंचे उत्पन्न देणारी फुलशेती; लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण A to Z मार्गदर्शन
याशिवाय, डख यांनी पुढील ५० वर्षांचा दीर्घकालीन हवामान अंदाजही मांडला आहे. त्यांच्या मते, २०२६ मध्ये कमी पाऊस झाल्यानंतर २०२७ आणि २०२८ या दोन वर्षांत चांगला पाऊस पडेल आणि एका वर्षातील पावसाची तूट भरून निघेल. भविष्यात ‘दोन वर्षे जास्त पाऊस आणि एक वर्ष कमी पाऊस’ असे हवामानाचे चक्र कायम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.