Onion News : कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घटना समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयातीला परवानगी दिली असून, या निर्णयामुळे देशातील शेतकरी आणि निर्यातदार दोघांनाही फायदा होणार आहे. आजपासून (7 डिसेंबर) दररोज 30 टनांच्या 50 आयात परवान्यांचे वितरण सुरू होणार असून, ज्यांनी आधी अर्ज केले होते त्यांनाच हे परमीट मिळणार आहे.
दिवसाला 15 हजार क्विंटल कांद्याची निर्यातीस परवानगी
मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशने दररोज 15,000 क्विंटल भारतीय कांदा आयात करण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल, अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. त्यांच्या मते, निर्यात वाढल्यास देशांतर्गत बाजारातही दराला उभारी मिळेल आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याची शक्यता वाढेल. दिघोळे म्हणाले, “जर सरकारने याचवेळी इतर देशांनाही निर्यातीची मुभा दिली असती, तर शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकण्याची वेळ आली नसती.”
केंद्र सरकारने पुढे निर्यातीवर निर्बंध आणू नयेत — शेतकरी संघटना
दिघोळे यांनी पुढे सांगितले की, जर आणखी देश भारतातून कांदा घेण्यास पुढे आले, तर दर आणखी सुधारू शकतात. जरी हा निर्णय उशिरा घेतला असला, तरीही संघटना त्याचे स्वागत करत आहे. त्यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की, पुढील काळात कांदा निर्यातीवर कोणतेही निर्बंध लागू करू नयेत, कारण निर्यात खुली राहिल्यास शेतकऱ्यांना स्थिर आणि चांगला आर्थिक आधार मिळू शकतो. “भारतातील कांदा परदेशात जाईल, तेव्हाच शेतकऱ्यांच्या खिशात खरा फायदा पोहोचेल,” असे दिघोळे म्हणाले.
उन्हाळी कांद्याचे नुकसान आणि दरघसरणीने शेतकरी त्रस्त
अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच नंतर पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक भागांत पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी जमीनही धोक्यात आली. एका बाजूला उत्पादन घटले, तर दुसऱ्या बाजूला बाजारात कांद्याच्या दरात अचानक मोठी घसरण दिसून आली, ज्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. याच नाराजीतून आज अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकीय कार्यालयात ट्रॅक्टरसह आंदोलन करत दरघसरणीचा निषेध नोंदवला.