कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, पिकाला खत-पाणी कितीही घातलं, पण जर तणांचा बंदोबस्त वेळेवर नाही झाला, तर हाती येणारं उत्पादन घटतं हे त्रिवार सत्य आहे. मग कांद्यामध्ये कोळपणी नेमकी कधी करावी? कोणतं तणनाशक कधी मारावं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची भर कशी द्यावी? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आणि तज्ञांचा सल्ला जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा. तुमचे उत्पादन वाढवण्याची हीच खरी गुरुकिल्ली आहे.
नमस्कार शेतकरी बांधवांनो! कांदा हे नगदी पीक आहे, पण या पिकात सर्वात मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे ‘तण’ (Weeds). तणांमुळे केवळ पिकाची वाढच खुंटत नाही, तर आपण दिलेले खत आणि पाणी मुख्य पिकाला न मिळता तणांनाच जास्त मिळते. म्हणूनच, कांद्याचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल, तर योग्य वेळी आंतरमशागत आणि तण नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण कांदा पिकातील कोळपणी, तणनाशकांचा वापर आणि मातीची भर कशी द्यावी, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
१. कोळपणी: टायमिंग आणि पद्धत महत्त्वाची..
कांदा लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोळपणीला खूप महत्त्व आहे. यामुळे जमीन भुसभुशीत राहते आणि हवा खेळती राहते.
पहिली कोळपणी: कांदा लागवड केल्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांनी, जेव्हा रोप जमिनीत स्थिर होते, तेव्हा पहिली कोळपणी करावी.
दुसरी कोळपणी: त्यानंतर लागवडीपासून ३० ते ३५ दिवसांच्या दरम्यान दुसरी कोळपणी उरकावी.
महत्त्वाची टीप: कोळपणी करताना घाईगडबड करू नका. ती अगदी हलक्या हाताने करावी, जेणेकरून रोपांच्या नाजूक मुळांना धक्का लागणार नाही. या टप्प्यावर जास्त खोलवर कोळपणी करणे टाळावे.
येथे वाचा – कांदा फुगवणीचा ‘बाप’ कोण? 0:52:34 की 0:42:47? कोणतं खत कधी वापरावं?
२. रासायनिक तणनाशकांचा वापर कसा कराल?
मजूर टंचाईमुळे किंवा तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास तणनाशके वापरणे फायदेशीर ठरते. पण कोणतं औषध कधी वापरायचं, हे गणित पक्कं हवं.
अ) लागवडीनंतर लगेच (उगवणपूर्व):
लागवड झाल्यानंतर पहिल्या ३ दिवसांच्या आत ‘पेंडीमिथिलीन ३८.७% सीएस’ हे तणनाशक वापरावे.
• प्रमाण: एकरी ७०० मिली.
• फायदा: मकारा, वाघनाखी, सावा, लोना गवत, घोळ, केना, माठ अशा विविध तणांचा हे औषध बंदोबस्त करते.
ब) उगवण पश्चात (लागवडीनंतर १५-२० दिवसांनी):
जर तण उगवून आले असेल, तर ‘ऑक्सीफ्लोरफेन २३.५% ईसी’ फवारावे.
• प्रमाण: एकरी १७० मिली.
• फायदा: सावा, लव्हाळा यांसारख्या चिवट तणांवर हे गुणकारी आहे.
क) संयुक्त तणनाशके (जोड तोडगा):
बाजारात दोन घटकांचे मिश्रण असलेली तणनाशके देखील उपलब्ध आहेत, जी अधिक प्रभावी ठरतात:
• पेंडीमिथिलीन २४% + ऑक्सीफ्लोरफेन ४% ZE: हे लागवडीनंतर ३-४ दिवसात फवारावे (प्रमाण: ९०० मिली/एकर). हे लोना, हराळी, मकारा आणि लव्हाळा यांसारख्या तणांना रोखते.
• प्रोपाक्विझाफॉप ५% + ऑक्सीफ्लोरफेन १२% ईसी: पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी फवारणी करावी (प्रमाण: ३५० मिली/एकर).
• क्विजालोफॉप इथाईल ४% + ऑक्सीफ्लोरफेन ६% ईसी: हे देखील १२-१५ दिवसांनी फवारावे (प्रमाण: ४०० मिली/एकर). हे खास करून ‘क्रॅब गवत’ आणि लव्हाळ्यासाठी उत्तम आहे.
येथे वाचा – कांदा पिकावर देशी दारूची फवारणी; पहा जबरदस्त जुगाड..
३. निंदणी आणि मातीची भर
केवळ औषध मारून चालणार नाही, तर हाताने तण काढणे (खुरपणी) आणि कांद्याला माती लावणे या गोष्टी उत्पादनाची गुणवत्ता ठरवतात.
खुरपणी: शक्य असल्यास खुरप्याने तण काढावे, पण मजुरांच्या उपलब्धतेनुसार नियोजन करा.
मातीची भर: हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे! कांद्याच्या मुळाशी थोडी माती चढवल्याने कांदा उघडा पडत नाही. यामुळे कांद्याचा आकार गोल गरगरीत होतो, रंग सुधारतो आणि साठवणुकीत कांदा सडत नाही. मात्र, खूप जास्त माती ढिगाऱ्यासारखी लावू नका, फक्त मुळं झाकली जातील एवढीच काळजी घ्या.
येथे वाचा – लाडक्या बहिणींना ‘नवीन वर्षाचं गिफ्ट’.. जानेवारीत या दिवशी 4500 रुपये मिळण्याची शक्यता..
४. शेतकरी मित्रांनो, ‘या’ चुका टाळा..
१. ओलावा आणि वाफसा: आंतरमशागत किंवा कोळपणी नेहमी जमीन कोरडी असताना किंवा वाफसा स्थितीत करावी. खूप चिखल किंवा ओलावा असताना कोळपणी टाळा.
२. वेळेचे भान: कांदा फुगायला सुरुवात झाल्यावर, म्हणजेच ६० ते ६५ दिवसांनंतर पिकात कोणतेही अवजार चालवू नका किंवा खोल आंतरमशागत करू नका. यामुळे कांद्याला इजा होऊन नुकसान होऊ शकते.
३. जमिनीला भेगा: पाणी दिल्यावर जर माती कडक होऊन भेगा पडत असतील, तर वरच्यावर हलकी कोळपणी करा. यामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहील. कांदा शेतीमध्ये योग्य वेळी घेतलेला निर्णयच तुम्हाला नफा मिळवून देतो. तणांचे वेळेवर नियोजन करा आणि भरघोस उत्पादन मिळवा..
महत्वाचे : कोणते फवारणी करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा..