नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या कांदा पिकाने ६०-७० दिवसांचा टप्पा ओलांडला असेल, तर तुमच्याही मनात एकच प्रश्न असेल – “कांद्याची साईज (फुगवण) जबरदस्त करण्यासाठी नेमकं काय सोडावं?” बाजारात ०:५२:३४ तर आहेच, पण सध्या ०:४२:४७ ची सुद्धा जोरदार चर्चा आहे. मग आपल्या कांद्यासाठी ‘बेस्ट’ कोणतं? गोंधळून जाऊ नका! या ब्लॉगमध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की कोणत्या स्टेजला कोणतं खत वापरल्याने तुमचा फायदा होईल. चला तर मग, जाणून घेऊया कांदा फुगवणीचं नेमकं तंत्र!
कांदा पीक आणि फुगवणीची महत्त्वाची स्टेज
शेतकरी दादांनो, कांदा पीक जेव्हा ६० ते ६५ दिवस (लाल कांदा) किंवा ७० ते ८० दिवस (उन्हाळी/गावठी कांदा) पूर्ण करतं, तेव्हा पिकाची शाकीय वाढ पूर्ण झालेली असते. आता खरी लढाई असते ती म्हणजे जमिनीतला कांदा पोसण्याची, म्हणजेच फुगवणीची..
या काळात आपण विद्राव्य खतांचा (Water Soluble Fertilizers) वापर करतो. पण नेमकं 0:52:34 निवडायचं की 0:42:47? याचं उत्तर तुमच्या शेतातील ‘कांद्याच्या परिस्थितीवर’ अवलंबून आहे.
कांदा फुगवण्यासाठी 0:52:34 खत निवडायचं की 0:42:47?
१. 0:52:34 – ‘स्लो पण दमदार’ रिझल्ट:
वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा विश्वास असलेलं हे खत! यामध्ये ५२% फॉस्फरस आणि ३४% पोटॅश असतं.
हे कधी वापरावं?
जेव्हा तुमच्या शेतात कांद्याचा आकार मागे-पुढे (Uneven) आहे. म्हणजे काही कांदे मोठे झालेत आणि काही अजून बारकेच आहेत. अशा वेळी ०:५२:३४ वापरणं फायद्याचं ठरतं. का? हे खत पिकाला लागू व्हायला थोडा वेळ घेतं (साधारण ७ ते ८ दिवस). हे ‘स्लो रिलीजिंग’ असल्यामुळे पिकाला सावकाश ताकद मिळते. यामुळे जे कांदे आकाराने लहान आहेत, त्यांनाही वाढायला वेळ मिळतो आणि प्लॉटमध्ये एकसारखी साईज तयार होण्यास मदत होते.
प्रमाण: एकरी ५ किलो.
टीप: जर कांद्याला अजून २-३ पाणी देणे बाकी असेल, तर हे खत नक्की वापरा.
२. 0:42:47 – ‘सुपरफास्ट’ ॲक्शन :
हे एक ऑक्साईड फॉर्ममधील (Oxide Form) प्रगत खत आहे. यात ४२% फॉस्फरस आणि ४७% पोटॅश आहे.
हे कधी वापरावं?
जेव्हा तुम्हाला कांदा लवकरात लवकर काढणीला आणायचा आहे, किंवा हाताशी वेळ कमी आहे. का? हे खत दिल्यावर त्याचे रिझल्ट अवघ्या ४ ते ५ दिवसांत दिसायला लागतात. हे ‘फास्ट रिलीजिंग’ असल्यामुळे कांदा पटकन ओढून येतो. पिकातील अन्नरस वेगाने खाली उतरतो आणि कांदा पक्व होतो.
प्रमाण: एकरी २.५ ते ३ किलो (हे ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्याने कमी मात्रेतही जोरात काम करते).
टीप: जर कांद्याला शेवटचं पाणी चालू असेल, किंवा बाजारभाव पकडण्यासाठी घाई असेल, तर हे खत सर्वोत्तम आहे.
येथे वाचा – रेशन सुरू ठेवण्यासाठी ताबडतोब करा हे काम; शेवटची तारीख आली जवळ…
मग फायद्याचा निर्णय कोणता?
शेतकरी मित्रांनो, निर्णय घेताना सोपं गणित लक्षात ठेवा:
जर तुमच्या कांद्याला अजून २-३ पाणी द्यायचे बाकी असतील आणि प्लॉटमध्ये कांद्याची साईज लहान-मोठी दिसत असेल, तर डोळे झाकून 0:52:34 (एकरी ५ किलो) वापरा. यामुळे एकसारखा माल तयार होईल.
जर कांदा शेवटच्या टप्प्यात आहे, एकच पाणी बाकी आहे आणि कांदा पटकन तयार करून काढायचा आहे, तर 0:42:47 (एकरी २.५ ते ३ किलो) वापरा.
तुमच्या कांद्याची स्टेज ओळखा आणि त्यानुसारच खत निवडा, जेणेकरून खर्चाची बचत होईल आणि उत्पन्नात वाढ होईल!
टीप: कोणतेही खत वापरण्यापूर्वी आपल्या स्थानिक कृषी तज्ज्ञाचा किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला नक्की घ्या.
येथे वाचा – कापूस उत्पादकांनो! आयात वाढली, उत्पादन घटले… पहा आता दरांचे पुढे काय होणार?