Onion rates : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवान्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवली आहे. सुरुवातीला ५० आयात परवान्यांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र आता ही संख्या थेट २०० वर नेण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीला मोठा हातभार लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुमारे १५०० टन कांद्याची आयात सुरू झाली आणि निर्यातीला गती मिळू लागली. याच पार्श्वभूमीवर आता आयात परवाने वाढवण्यात आल्याने देशांतर्गत तसेच स्थानिक बाजारात कांद्याच्या दरांमध्ये हालचाल दिसून येत आहे.
बांगलादेश सरकारने स्पष्ट केले आहे की, स्थानिक बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी १३ डिसेंबरपासून दररोज २०० आयात परवाने (IP) जारी करण्यात येणार आहेत. पीआयडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक परवान्याअंतर्गत पूर्वीप्रमाणेच ३० टनांपर्यंत कांद्याची आयात करता येणार आहे. यामुळे भारतात कांद्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
येथे वाचा – महिलांना खरचं पुन्हा eKYC करावी लागणार? पहा…नाहीतर लाभ थांबू शकतो!
दरम्यान, याआधी सादर केलेले सर्व अर्ज वैध राहणार आहेत. म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ पासून परवान्यासाठी अर्ज केलेले आयातदारच पुन्हा अर्ज करू शकतील. एका वेळी एका आयातदाराला एकाच अर्जाची मुभा देण्यात आली आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, कांद्याची बाजारपेठ नियंत्रणात राहावी यासाठी ही प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
भावात सुधारणा, पण मर्यादा…
बांगलादेशच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरांमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी आधीच चाळीत साठवलेला कांदा विक्रीला काढल्याने सध्या बाजारात कांद्याचा साठा कमी असल्याची माहिती पुढे येत आहे. ज्यांच्याकडे अजूनही काही प्रमाणात कांदा शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांना मर्यादित का होईना, पण चांगले दर मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे..
येथे वाचा – गाय-म्हशी घ्या स्वस्तात; तब्बल 50% अनुदान, असा करा अर्ज..