म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित; येथे पहा ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतील नवीन किमती..

MHADA Flats Mumbai : सामान्य माणसासाठी म्हाडाचे घर (Mhada Flat) म्हणजे केवळ चार भिंती नाहीत, तर डोक्यावर स्वस्तात छप्पर मिळण्याची संधी, भाड्याच्या ओझ्यातून मुक्ती आणि उद्याची सुरक्षितता आहे. वाढत्या महागाईत मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर असणे अनेकांसाठी दूरचे स्वप्न असते. अशा वेळी म्हाडाचे घर हे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटासाठी आशेचा आधार देणारी संधी ठरते.

अशातच मुंबईत म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेअंतर्गत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेतील घरांच्या नवीन किमती अधिकृतपणे निश्चित करण्यात आल्या असून, यावेळी दरांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत, कोणत्या भागातील घरे महागली आहेत आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा किती परिणाम होणार आहे. हे जाणून घेणे आता गरजेचे ठरणार आहे. घर खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा, कारण एका आकड्यामुळे तुमचे संपूर्ण आर्थिक गणित बदलू शकते…

मुंबईत सोडतीशिवाय घर मिळवून देणाऱ्या म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेकडे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी आशेने पाहिले होते. मात्र, या योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किमती पाहता अनेकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने या योजनेतील १२५ घरांच्या किमती निश्चित केल्या असून, त्या मागील वर्षांच्या तुलनेत वाढलेल्या आहेत.

येथे वाचा – सिडकोची नवीन लॉटरी; ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू होणार..

म्हाडाच्या घरांच्या नवीन किंमती किती?

सध्या या घरांच्या किमती किमान ३६ लाख ३९ हजार रुपयांपासून थेट ७ कोटी ५८ लाख रुपयांपर्यंत आहेत. सोडतीतील बहुतांश घरे दीड कोटी ते साडेसात कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे चित्र आहे. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरे महाग असल्याने त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. काही अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील घरेही जुनी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे रिक्त राहिली आहेत. याच पार्श्वभूमीवर, दोन किंवा त्याहून अधिक वेळा सोडत काढूनही न विकली गेलेली घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या योजनेतून विक्रीस काढण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे.

ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील घरांच्या किमती पहिल्या सोडतीत साडेसात कोटी रुपये ठेवण्यात आल्या होत्या. या दरांवर टीका झाल्यानंतर पुढील सोडतीत किंमती कमी करण्यात आल्या आणि २०२४ च्या सोडतीत या घरांसाठी ६ कोटी ७७ लाख ते ६ कोटी ८२ लाख रुपये दर आकारण्यात आले. मात्र, आता ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत या घरांची किंमत पुन्हा वाढवून सुमारे ७ कोटी ५८ लाख रुपये ठेवली जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येथे वाचा – सिडकोची नवीन लॉटरी; ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू होणार..

त्याचप्रमाणे, जुहू विक्रांत येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत पूर्वी ४ कोटी ३८ लाख रुपये होती, ती आता ५ कोटी रुपयांहून अधिक असणार आहे. अंधेरी पश्चिमेतील ट्यूलिप सोसायटीमधील घरांसाठी ५ कोटी २६ लाख रुपये आणि ४ कोटी २३ लाख रुपये इतके दर निश्चित करण्यात आले आहेत.

एकूणच, ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेत घर मिळण्याची संधी असली तरी वाढलेल्या किमतींमुळे ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच जात असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group