राज्यात एकदा पुन्हा ढगाळ वातावरण तयार होत असल्याचे संकेत मिळत असून, आवकाळी पावसाबाबत चर्चा सुरू झाली आहे. हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, सध्या देशभरात हवामान प्रणाली सक्रिय आहे. यामध्ये ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पाचा प्रभाव महत्त्वाचा ठरत आहे.
उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रभावी असल्याने पूर्व भारतातील अनेक राज्यांसह राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात धुके व धुंदीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात धुक्याचा परिणाम अधिक तीव्र स्वरूपात जाणवू शकतो. दरम्यान, थंडीच्या लाटेचा विचार करता पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगणा आणि संपूर्ण कर्नाटकात कडाक्याची थंडी कायम असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास, राज्य सध्या थंडीच्या लाटेच्या सीमारेषेवर असल्याने अनेक भागांत अजूनही जाणवण्यासारखी थंडी आहे. काही ठिकाणी किमान तापमान ११ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात असून, हे कडाक्याच्या थंडीचे संकेत मानले जात आहेत. येत्या काही दिवसांत थंडी अचानक संपणार नसून, तिची तीव्रता चढ-उतार होत राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
येथे वाचा – हरभरा मर रोगावर 100% इलाज; पहा हरभऱ्यावरील बुरशी कशी थांबवावी?
राज्यात अवकाळी पाऊस पडणार का?
दरम्यान, या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रासह पश्चिम मध्य प्रदेशात हलके ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक परिसरात ढगाळ परिस्थितीचा पहिला संकेत हवामान मॉडेलमधून दिसून येत आहे.
पावसाच्या दृष्टीने सध्या मध्य भारतावर विशेष पावसाळी प्रणाली सक्रिय नाही. केवळ केरळ, तामिळनाडू आणि श्रीलंका या भागांत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच, अतिउत्तरेकडील जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे बर्फवृष्टी किंवा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काळात बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते, जे विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
येथे वाचा – अर्ध्या खर्चात वांग्याची शेती; ही ट्रिक बनवेल मालामाल..
मात्र, सध्या भारतीय भूभागावर कोरडे वातावरण असल्याने, कमी दाबाच्या क्षेत्रापेक्षा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता असल्याचे डॉ. बांगर यांनी स्पष्ट केले. धुके आणि थंडीचा पिकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती प्रतिबंधात्मक फवारणी करावी, तसेच धुक्यामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.