Kharif Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वत्र एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे खरीप हंगाम २०२५ चा पीक विमा. “आमचा पीक विमा जमा झाला का?”, “कधी जमा होणार?”, “नेमकी किती रक्कम मिळणार?” असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील. खरं तर, दरवर्षी साधारणतः नोव्हेंबरमध्ये मिळणारा पीक विमा यावर्षी जानेवारी उलटूनही जमा झालेला नाही. मग नेमकं अडलंय कुठे? आणि तुमच्या खात्यात पैसे नक्की कधी येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया.
उशीर का होतोय?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी १५ जानेवारीपासून पीक विमा वाटप सुरू होणे अपेक्षित होते. उशीर झाल्यास विमा कंपन्यांना दंड आकारला जाईल, असेही सांगण्यात आले होते. तरीही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही.
यामागे काही तांत्रिक कारणे आहेत. पीक विम्याचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे डेटा जाणे, त्यानंतर विमा कंपन्यांनी त्याचे कॅल्क्युलेशन करणे या प्रक्रियेत वेळ लागत आहे. पण आनंदाची बातमी म्हणजे, गेल्या आठवड्यातच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी माहिती दिल्यानुसार, राज्य सरकारने ८९ ते ९० लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा डेटा केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
येथे वाचा – दुष्काळ की अवकाळी पाऊस? पहा 2026 चा पंजाब डख यांचा खरा हवामान अंदाज
हेक्टरी १७,००० रुपये मिळणार का?
ही एक मोठी शंका शेतकऱ्यांच्या मनात आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे हेक्टरी १७,००० रुपयांपर्यंत मदत मिळणार असे म्हटले होते. पण याचा अर्थ असा नाही की, सरसकट सर्वांना १७,००० रुपये मिळतील.
२०२५ च्या सुधारीत पीक विमा योजनेनुसार, विम्याचे वाटप ‘ईल्ड बेस’ (Yield Base) म्हणजेच उत्पादकतेच्या आधारावर होणार आहे.
ज्या महसूल मंडळात सॅटेलाईट इमेजरी आणि तंत्रज्ञानाद्वारे ५०% पेक्षा जास्त नुकसान सिद्ध झाले आहे, तिथे विम्याची रक्कम ठरवली जाईल.
मागील ७ वर्षांपैकी सर्वाधिक उत्पन्न असलेल्या ५ वर्षांची सरासरी आणि यावर्षीचे उंबरठा उत्पन्न (Threshold Yield) यांची तुलना करून नुकसान भरपाई ठरवली जाईल. त्यामुळे १७,००० रुपये ही मर्यादा असली तरी, तुमच्या महसूल मंडळातील नुकसान आणि सरासरी उत्पन्नावर तुम्हाला मिळणारी रक्कम अवलंबून असेल.
येथे वाचा – या तारखेला थकीत असाल तरच कर्जमाफी मिळणार? पहा रेगुलर वाल्यांना नेमकं काय मिळणार..
कोण पात्र आहे?
राज्य शासनाने २८२ तालुके नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित म्हणून घोषित केले आहेत.
२५३ तालुके: पूर्णतः बाधित
२९ तालुके: अंशतः बाधित
(महत्वाची टीप: यात ‘भात’ (धान) पिकाचा समावेश नाही, त्याव्यतिरिक्त इतर पिकांसाठी हे लागू आहे.) या तालुक्यांमधील महसूल मंडळांना पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे.
पैसे कधी मिळणार?
सध्याची परिस्थिती पाहता, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीक विमा वितरणाला गती मिळण्याची शक्यता आहे. साधारणतः २४-२५ फेब्रुवारीनंतर चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत विम्याची रक्कम आणि पात्र महसूल मंडळांची यादी जाहीर होऊ शकते.
येथे वाचा – लाल कांद्याची हवा.. मिळतोय तब्बल एवढा भाव
आता काय करायचे?
सध्या तरी आपण वाट पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या पीक विम्याचे स्टेटस नक्की तपासा.
PMFBY पोर्टल किंवा PMFBY ॲप वर जाऊन आपली पॉलिसी सक्रिय आहे की नाही हे तपासा.
जेव्हा कॅल्क्युलेशन पूर्ण होईल, तेव्हा तिथे तुम्हाला मिळणारी रक्कम दिसू लागेल.
शेतकरी मित्रांनो, धीर धरा! शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच याबद्दल आनंदाची बातमी मिळेल अशी आशा करूया.