हरभऱ्यात मर रोगला ब्रेक! पहिली फवारणी देणार जबरदस्त फुटवे

हरभरा पिकासाठी पहिली फवारणी महत्त्वाची; मर रोगावर आळा आणि फुटव्यात मोठी वाढ

हरभऱ्याचे निरोगी आणि भरघोस उत्पादन हवे असल्यास सुरुवातीला घेतली जाणारी फवारणी निर्णायक ठरते. साधारण २० ते २५ दिवसांचे पीक असताना ही फवारणी करणे सर्वाधिक उपयुक्त मानली जाते. हा टप्पा महत्त्वाचा असण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हरभऱ्यात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या ‘मर’ रोगावर सुरुवातीलाच नियंत्रण मिळवणे. फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे होणारा हा रोग थेट मुळांवर हल्ला करून लागवडीनंतर, फुलोऱ्यात किंवा घाटे धरण्याच्या अवस्थेतसुद्धा रोप मरू शकते. म्हणूनच, वाढीच्या प्राथमिक टप्प्यात फवारणी करून हा धोका कमीत कमी ठेवणे गरजेचे आहे.

या फवारणीत पिकाचा मर रोग थांबवणे, फुटवे वाढवणे आणि सुरुवातीच्या अळीचे नियंत्रण — हे तिन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य औषधांचा समावेश आवश्यक आहे. १५ लिटरच्या पंपासाठी औषधांचे प्रमाण पुढीलप्रमाणे घ्यावे:

1. अळीनाशक: प्रारंभिक अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमामेक्टिन १२ ग्रॅम वापरावे.

    2. बुरशीनाशक: मर रोगावर प्रभावी नियंत्रणासाठी झेनेट ३० मिली, किंवा थायपोडीन मिथाईल ४० ग्रॅम, किंवा एलियट ३५ ग्रॅम — यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक वापरता येते.

    3. टॉनिक / वाढ प्रोत्साहक: फुटवे अधिक प्रमाणात निघण्यासाठी आणि पिकाला जोम येण्यासाठी ऑक्सिजन ५० मिली, किंवा इसाबियन ४० मिली, किंवा बायोविटा ४० मिली यापैकी एकाचा समावेश करावा.

    4. खत (NPK): फॉस्फरसची गरज पूर्ण करण्यासाठी १२:६१:० (MAP) १०० ग्रॅम घ्यावे. हे मिश्रण फुटवे वाढवण्यास मदत करते. बजेट असेल तर फवारणीचा प्रभाव वाढवण्यासाठी ‘स्टिकर’ वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

    येथे वाचा – फवारणी खर्च कमी आणि जास्त उत्पादन; शेतकऱ्यांनो ही ट्रिक जास्त फायद्याची..

    योग्य वेळी घेतलेली ही पहिली फवारणी हरभऱ्याला सुरुवातीपासून संरक्षण देऊन पिकाची तंदुरुस्ती वाढवते. मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, फुटवे भरभरून निघतात आणि अळीवर नियंत्रण मिळते. परिणामी, संपूर्ण हंगामात पिकाची वाढ अधिक सक्षम राहून उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वाढते.

    Leave a Comment

    Join WhatsApp Group