लाखोंचे उत्पन्न देणारी फुलशेती; लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण A to Z मार्गदर्शन

Gerbera Farming : सजावटीसाठी, कुंड्यांमध्ये लावण्यासाठी, फुलदाणीत मांडणीसाठी तसेच बागेच्या मध्यभागी किंवा कडेला शोभा वाढवण्यासाठी जरबेरा हे अत्यंत लोकप्रिय फुलझाड आहे. आकर्षक रंगछटा, विविध आकार, उत्तम दर्जा आणि काढणीनंतर दीर्घकाळ टिकण्याची क्षमता यामुळे जरबेराच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असते. या फुलांपासून सुंदर हार, दर्जेदार बुके आणि सजावटीचे गुच्छ तयार करता येतात. त्यामुळे देशांतर्गत विक्रीसोबतच परदेशात निर्यातीसाठीही जरबेरा शेतीमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

या फुल शेतीसाठी हवामान कसे असावे?

जरबेरा पीक उष्ण, कोरडे तसेच समशीतोष्ण हवामानात उत्तम प्रकारे वाढते. भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा आणि साधारण ५०० ते ६१५ मिमी पर्जन्यमान या पिकासाठी अनुकूल ठरते. मात्र अतिवृष्टी, दीर्घकाळ टिकणारी कडाक्याची थंडी किंवा तीव्र उन्हाळा उत्पादनावर विपरीत परिणाम करू शकतो. दिवसा १२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान, ५० ते ६० टक्के आर्द्रता आणि रात्री साधारण १२ अंश तापमान असल्यास फुलांचा दर्जा अधिक चांगला मिळतो.

जमीन कशी असावी?

पाण्याचा योग्य निचरा होणारी हलकी, मध्यम काळी किंवा पोयट्याची जमीन जरबेरासाठी सर्वोत्तम मानली जाते. चोपण, चुनखडीयुक्त किंवा पाणी साचणाऱ्या जमिनीत ही लागवड यशस्वी होत नाही. तसेच अतिशय भारी व जास्त सुपीक काळ्या जमिनीत फक्त पानांची वाढ होते आणि फुलांचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. साधारण ३० ते ४५ सेंटीमीटर खोलीची, ५.० ते ७.५ सामू (pH) असलेली जमीन या पिकासाठी योग्य ठरते. हलक्या जमिनीतही पुरेशा सेंद्रिय खतांच्या वापराने चांगले उत्पादन घेता येते.

येथे वाचा – कांद्याला हेच खत वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा.. पहा उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन..!

सुधारित जाती

क्रीम क्लेमेंटाइन, मरोन क्लेमेंटाइन, फ्लेमिंगो, फ्रेडोरेलो, गोल्डन गेट, ऑरनेला, कोझ्याक, गोल्ड डिस्क, मेलो डिस्क, लेडी, टोरो, स्पिंक्स, सांग्रीया, बित्राफा, लव्हली डिस्क, पसादेना, पारिजात, पालरेमो, पनामा, पामेला, पोलर, झेब्रा, विजय ट्रोपिकल, स्पायडर आदी जाती शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

नवीन जरबेरा रोपे तयार करण्याची पद्धत

जरबेराची लागवड बियांपासून करता येते. तसेच शाखीय पद्धत आणि ऊतीसंवर्धन (टिश्यू कल्चर) तंत्रज्ञानाद्वारेही निरोगी आणि एकसारखी रोपे तयार करता येतात.

लागवड पद्धत

व्यावसायिक स्तरावर जरबेराची लागवड करताना अतिवृष्टीचा काळ टाळून वर्षभर कोणत्याही वेळी लागवड करता येते. लागवडीपूर्वी जमीन खोल नांगरून दोन वेळा वखरणी करून भुसभुशीत करावी. त्यानंतर २० ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जून महिन्यात बियांची पेरणी गादीवाफ्यावर करावी. रोपे ४ ते ६ पाने आली की त्यांची शेतात पुनर्लागवड करावी.
४५ ते ६० सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढून, सरीच्या एका बाजूला ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर प्रत्येकी एक फुटवा लावावा. लागवड करताना रोपाचा मध्यवर्ती वाढीचा भाग मातीखाली जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

येथे वाचा – शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच! पण फडणवीसांनी विधानसभेत ठेवली ‘ही’ अट

खत व पाणी व्यवस्थापन

जरबेरा पिकाला सेंद्रिय खतांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. फुलांची प्रत आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी भरपूर सेंद्रिय खतांचा वापर करावा. व्यापारी लागवडीसाठी हेक्टरी २० ते ३० टन कुजलेले शेणखत देणे आवश्यक आहे. त्यासोबत लागवडीच्या वेळी हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यात विभागून द्यावी. पाण्याच्या बाबतीत नियमित पण संतुलित सिंचन गरजेचे आहे. फुलांच्या बहारात जास्त पाणी दिल्यास फुलांची गुणवत्ता कमी होऊ शकते. पावसाळ्यात १०–१२ दिवसांनी, हिवाळ्यात ८–९ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ४–६ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादन एकसमान आणि स्थिर मिळते.

आंतरमशागत

हे पीक दीर्घकाळ शेतात राहत असल्याने लागवडीपूर्वी बहुवर्षायू तणांचा पूर्ण नाश करणे महत्त्वाचे आहे. लागवडीनंतर वेळोवेळी खुरपणी करून तण नियंत्रण ठेवावे. झाडांना मातीचा भर देणे, सुकलेली व रोगट पाने काढून टाकणे अशी नियमित मशागत केल्यास झाडांची वाढ जोमदार होते.

फुलांची काढणी व उत्पादन

लागवडीनंतर साधारण दीड ते दोन महिन्यांत फुले येऊ लागतात. बाहेरील पाकळ्यांवरील परागकण परिपक्व झाल्यावर फुले जमिनीलगत कापून घ्यावीत. काढणीनंतर फुलांचे दांडे २–३ तास पाण्यात ठेवावेत. नंतर रंग, दांड्याची लांबी व आकारानुसार प्रतवारी करून १ ते २ डझन फुलांच्या जुड्या तयार करून बाजारात पाठवाव्यात. एकदा लागवड केल्यानंतर २ ते ३ वर्षे सातत्याने उत्पादन मिळते. दरवर्षी हेक्टरी सुमारे ५ ते ७ लाख फुलांचे उत्पादन घेता येते. सुधारित जातींच्या लागवडीने एका झाडापासून वर्षाला ४० ते ५० फुले मिळतात आणि पुढील वर्षी उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढते.

Leave a Comment

Join WhatsApp Group