२०२६ संपूर्ण हवामान अंदाज, पहा कसा असणार खरीप हंगाम

सध्या समाजमाध्यमांवर ‘यंदा पाऊस कमी पडणार’, ‘एल निनोमुळे दुष्काळ पडणार’ अशा चर्चांना मोठे उधाण आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात काहीशी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, खाजगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने (Skymet) ७ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या २०२६ च्या मान्सून अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. यंदाचा खरीप हंगाम कसा राहील आणि मान्सूनची वाटचाल कशी असेल, याचा हा सविस्तर आढावा.

सरासरीपेक्षा केवळ ५ ते ६ टक्के पाऊस कमी

स्कायमेटच्या ताज्या अंदाजानुसार, यावर्षी देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडेल. देशभरात मान्सून हंगामात सरासरी ८६८ मिलीमीटर पाऊस पडतो, तो यंदा ८१६ मिलीमीटर पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच नेहमीपेक्षा फक्त ५२ मिलीमीटर पाऊस कमी पडेल. सर्वसाधारणपणे देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस होतो, त्याऐवजी यंदा तो ९० ते ९५ टक्के राहील. केवळ ५-६ टक्क्यांची ही तूट म्हणजे देशाला किंवा शेतकऱ्यांना धोक्याची घंटा मानण्याचे कारण नाही.

जून-जुलैमध्ये दमदार पाऊस; पेरण्यांना मिळणार गती

खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. जून आणि जुलै या पेरणीच्या मुख्य महिन्यांमध्ये ‘एल निनो’चा (El Nino) प्रभाव सक्रिय नसणार आहे. त्यामुळे या काळात सरासरीइतका दमदार पाऊस होईल. परिणामी, खरीपाच्या पेरण्या वेळेवर आणि उत्तम होतील तसेच पिकांची उगवणही चांगली होईल. जुलै अखेरपर्यंत पिके दीड फुटांपर्यंत वाढलेली असतील. एकदा पीक हाताशी लागले की शेतकरी ते जगवतो, त्यामुळे हंगामाची सुरुवात अत्यंत सकारात्मक होणार आहे.

येथे वाचा – खाद्यतेलाचे दर वाढले; आता 5 लिटरच्या कॅनची किंमत किती?

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनो सक्रिय होणार?

ऑगस्ट आणि सप्टेंबर या मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे झाल्यास पावसाचे मोठे खंड पडू शकतात किंवा काही ठिकाणी अचानक अतिवृष्टी होऊ शकते. मात्र, याला दिलासा देणारा एक मोठा नैसर्गिक घटक म्हणजे ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD). सध्या IOD ची स्थिती ‘पॉझिटिव्ह’ आहे. जर ती तशीच राहिली, तर एल निनोचा भारताच्या मान्सूनवर फारसा नकारात्मक फटका बसणार नाही. याआधीही आयओडीने भारताला अशा स्थितीत तारले आहे.

येथे वाचा – खाद्यतेलाचे दर वाढले; आता 5 लिटरच्या कॅनची किंमत किती?

IMD च्या अधिकृत अंदाजाची प्रतीक्षा

स्कायमेटच्या मते, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ६ टक्के पावसाची तूट जाणवू शकते. परंतु, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की स्कायमेट ही एक खाजगी संस्था आहे. देशाचे अधिकृत ‘भारतीय हवामान खाते’ (IMD) यांचा अंतिम अंदाज येणे अद्याप बाकी आहे. आयएमडीचा अंदाज आल्यावर मान्सूनचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

निष्कर्ष: एकूणच परिस्थिती पाहता, यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीचे दोन महिने पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवांना आणि अर्ध्यावट माहितीला बळी पडून ‘पॅनिक’ होऊ नये. खरीप हंगामासाठी सकारात्मक मनाने नियोजन करावे.

Leave a Comment

Join WhatsApp Group