मुंबई : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सिडकोच्या EWS (आर्थिक दुर्बल घटक) आणि LIG (कमी उत्पन्न गट) या वर्गातील सुमारे १७ हजार घरांच्या किमती घटणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. (Cidco Homes Navi Mumbai)..
सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या दरांमुळे अनेक नागरिकांना घर खरेदी करणे कठीण जात होते. यासंदर्भात सातत्याने मागण्या होत होत्या. विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनीही सरकारकडे हा मुद्दा लावून धरला होता. या मागण्यांवर चर्चा आणि बैठका झाल्यानंतर अखेर सिडकोच्या घरांच्या दरात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सिडकोच्या लॉटरीतील हजारो घरं अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत. ‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेला यामुळे बळ मिळेल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सामान्य कुटुंबांना स्वतःचं घर घेण्याचा मार्ग आता अधिक सोपा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
येथे वाचा – आज मुंबईत घरांची लॉटरी; कुणाला लागणार घर? पहा BMC लॉटरी अपडेट..
यापूर्वी सिडकोच्या घरांच्या किमती जास्त असल्याने सर्वसामान्यांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हता. त्यामुळे सिडकोच्या योजनांमध्ये अर्जांची संख्या कमी राहिली होती. या पार्श्वभूमीवर दर कपातीची मागणी जोर धरत होती. अखेर राज्य सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतल्याने घर खरेदीदारांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास योजना राबवत असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ५० एकरांहून अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडांवर पुनर्विकास प्रकल्प हाती घेतले जाणार असून, अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मुंबईतील १७ ठिकाणी ही योजना राबवली जाणार असून, घाटकोपरमधील रमाबाई नगरचाही त्यात समावेश आहे.
येथे वाचा – पुणे म्हाडा लॉटरीची तारीख ठरली; या दिवशी वाटणार ४ हजार घरे..
महाग दरांचा फटका, अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद
सिडकोने नवी मुंबईतील २६,५०० घरांच्या विक्रीसाठी ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेसाठी बुकिंग शुल्क भरणाऱ्या अर्जदारांची संख्या २६ हजारांचाही टप्पा गाठू शकली नव्हती. प्रत्यक्षात २१,३९९ अर्जदारांनीच बुकिंग शुल्क भरले.
१९ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोडत पार पडली. यामध्ये १९,५१८ अर्जदारांना घरं मिळाली. उर्वरित १,८८१ अर्जदारांनाही घर देण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. मात्र, जास्त किमतीमुळे काही अर्जदारांनी घर नाकारल्याचंही समोर आलं होतं. आता दरात झालेल्या कपातीमुळे सिडकोच्या घरांना पुन्हा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.