Cidco Flats : सिडको लॉटरीमध्ये घर लागलंय किंवा घेण्याचा विचार करत आहात? मग तुमच्याही मनात हे दोन महत्त्वाचे प्रश्न नक्कीच आले असतील – ‘सिडकोचे घर आपण विकू शकतो का?’ आणि ‘ते भाड्याने देता येते का?’ या प्रश्नांची अचूक उत्तरे आणि त्यामागील नियम जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा. यामध्ये आपण ‘लॉकिंग पीरियड’ आणि घराच्या गुंतवणुकीतून ईएमआय (EMI) कसा मॅनेज करता येईल, यावर सविस्तर चर्चा केली आहे.
सिडकोच्या लॉटरीमध्ये (Cidco Lottery) घर मिळणे हे अनेक सर्वसामान्यांचे स्वप्न असते. पण एकदा का लॉटरीमध्ये नाव आले आणि घराचा ताबा मिळण्याची वेळ आली, की आपल्या सर्वांच्या मनात गुंतवणुकीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न म्हणजे – “आपण सिडकोचे घर विकू शकतो का?” आणि “हे घर भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवता येते का? जर तुम्हीही या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असाल, तर काळजी करू नका! आज आपण सिडकोच्या घरांशी संबंधित विक्री आणि भाडेकरू ठेवण्याबाबतचे नियम साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
सिडकोचे घर लगेच विकता येते का? (Sale Rules)
अनेकदा लोक गुंतवणुकीचा (Investment) विचार करून सिडकोच्या लॉटरीमध्ये अर्ज करतात. पण घर मिळाल्यावर ते लगेच विकता येते का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. सिडकोने घरांच्या विक्रीवर काही निर्बंध म्हणजेच ‘लॉकिंग पीरियड’ (Locking Period) ठेवलेला आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार, विशेषतः LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या कॅटेगरीमधील घरांसाठी हा नियम लागू होतो.
येथे वाचा – तयारीला लागा! मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची 44 घरे.. पहा ही घरं का आहे खास?
नेमका नियम काय आहे?
तुम्ही ज्या दिवशी घराचे रजिस्ट्रेशन (Registration) आणि ॲग्रीमेंट करता, त्या तारखेपासून पुढील ३ वर्षे तुम्हाला ते घर विकता येत नाही.
कालावधी कधीपासून मोजला जातो?
लक्षात ठेवा, हा कालावधी तुम्हाला लॉटरी लागल्यापासून नाही, तर तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरून जेव्हा घराचा अधिकृत करार (Agreement) करता, तेव्हापासून मोजला जातो. त्यामुळे, जर तुम्ही घर विकण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किमान ३ वर्षे वाट पाहावी लागेल. त्यानंतरच तुम्ही कायदेशीररीत्या ते घर दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकता.
येथे वाचा – म्हाडाची ही राखीव घरे आता खुल्या प्रवर्गासाठी? पहा ही घरे कुठे आहे?
सिडकोचे घर भाड्याने देता येते का? (Renting Rules)
आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. घर विकायला तर ३ वर्षे बंदी आहे, मग तोपर्यंत घर रिकामे ठेवायचे का? की ते भाड्याने देता येते? याबाबत आनंदाची बातमी अशी आहे की, तुम्ही सिडकोचे घर भाड्याने देऊ शकता. घराच्या ॲग्रीमेंटमध्ये ‘घर भाड्याने देऊ शकत नाही’ असा कोणताही उल्लेख सहसा नसतो. उलट, सध्या तळोजा, कळंबोली, घणसोली आणि इतर सेक्टरमधील (उदा. स्वप्नपूर्ती, वास्तुविहार) अनेक सिडको धारकांनी आपली घरे भाड्याने दिली आहेत.
येथे वाचा – सिडकोची आणखी एक लॉटरी जाहीर.. फॉर्म भरणे सुरू.. पहा घरांचे लोकेशन..
भाड्याने देण्याचा मोठा फायदा
घर भाड्याने दिल्यास तुम्हाला त्यातून दरमहा जे उत्पन्न मिळते, त्याचा वापर तुम्ही घराचा ईएमआय (EMI) भरण्यासाठी करू शकता. यामुळे तुमच्या खिश्यावर पडणारा आर्थिक बोजा हलका होतो आणि तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरते.
थोडक्यात सांगायचे तर… जर तुम्हाला सिडकोचे घर लागले असेल, तर तुम्ही ते लगेच विकू शकत नाही (किमान ३ वर्षांचा वेटिंग पीरियड आहे), पण तुम्ही ते बिंदासपणे भाड्याने देऊ शकता. यामुळे तुमचे घर रिकामे राहणार नाही आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासही मदत होईल.