Mumbai Housing Lottery : मुंबई महापालिकेच्या पहिल्यावहिल्या घर सोडतीचा टप्पा अखेर पार पडला असून, ४२६ घरांपैकी ३७३ घरांना विजेते मिळाले आहेत. मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने तब्बल ५३ घरे अर्जाअभावी रिक्त राहिली आहेत. शनिवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पालिका मुख्यालयात संगणकीय पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. विविध योजनांतर्गत उपलब्ध झालेल्या घरांचे वितरण करण्यासाठी महापालिकेने प्रथमच अशी सोडत राबवली. या प्रक्रियेत ३७३ कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, तर काही ठिकाणच्या घरांना एकही अर्ज न आल्याने ती विक्रीवाचून राहिली.
घरांच्या किमतींमुळे कमी प्रतिसाद
विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील कलम ३३ (२०) अंतर्गत २४० घरे, तर १५ टक्के एकात्मिक योजनेतून १८६ अशी एकूण ४२६ घरे विक्रीसाठी उपलब्ध होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संगणकीय सोडत पद्धतीने ही घरे देण्याचा निर्णय घेत नोंदणी व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र घरांच्या किमती तुलनेने जास्त असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ४२६ घरांसाठी केवळ २१५१ अर्ज दाखल झाले.
तांत्रिक अडचणींमुळे सोडत लांबली
मुळात ही सोडत २० नोव्हेंबर रोजी काढण्याचे नियोजन होते. पण तांत्रिक अडचणी, अपुरी तयारी आणि संगणकीय प्रणालीतील त्रुटींमुळे देखरेख समितीने आक्षेप नोंदवत सोडत रद्द केली होती. त्यानंतर आवश्यक सुधारणा करून, प्रणालीची चाचणी घेत अखेर १३ डिसेंबर रोजी सोडत पार पडली. पालिकेच्या मालमत्ता विभागाने ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
५३ घरांना शून्य प्रतिसाद
एकूण २१५१ अर्ज सोडतीत सहभागी होते. प्रत्यक्षात ३७३ घरांसाठीच स्पर्धा झाली, तर ५३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ४२६ पैकी केवळ ३७३ घरांची सोडत निघाली.
इथे वाचा – सिडकोची 17 हजार घरे स्वस्तात मिळणार; सिडकोच्या घरांवर मोठी सूट!
विजेत्यांना ७ दिवसांत देकारपत्र
आता विजेत्यांना सात दिवसांत देकारपत्र पाठवण्यात येणार असून, त्यानंतर घरांची रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र घरांच्या किंमती लक्षात घेता विजेते प्रत्यक्षात घरे स्वीकारतात की परत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतीक्षा यादीतून दुसरी संधी
घर नाकारल्यास प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. पालिकेने प्रत्येक घरासाठी स्वतंत्र प्रतीक्षा यादी तयार केली असून, त्यातही ३७३ जणांचा समावेश आहे. मात्र प्रतीक्षा यादीतील अर्जदारानेही घर नाकारल्यास ते घर रिक्तच राहणार आहे. त्यामुळे अखेर किती घरांची प्रत्यक्ष विक्री होते, रिक्त घरांसाठी पुन्हा सोडत काढली जाणार का आणि ती केव्हा होणार हे सर्व चित्र सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.