म्हाडाची ही राखीव घरे आता खुल्या प्रवर्गासाठी? पहा ही घरे कुठे आहे?

MHADA Flats : म्हाडाच्या घरात स्वतःचं हक्काचं घर असावं असं तुम्हालाही वाटतं का? पण आरक्षणाच्या नियमांमुळे किंवा लॉटरीच्या क्लिष्ट गणितामुळे तुमची संधी हुकतेय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते! म्हाडाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील (PMAY) हजारो घरे विक्रीविना पडून आहेत आणि आता प्रशासनाने याबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आरक्षित प्रवर्गासाठी राखीव असलेली ही घरे आता चक्क ‘खुल्या प्रवर्गासाठी’ (Open Category) उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. पण यामागे नेमकं कारण काय? आणि खरंच या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल का? जाणून घेण्यासाठी हा सविस्तर ब्लॉग वाचा.

नमस्कार मित्रांनो! आपल्या सर्वांना माहित आहे की, म्हाडा ही सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारी एक विश्वासार्ह संस्था आहे. म्हाडाच्या कोणत्याही योजनेत विविध सामाजिक आणि विशेष प्रवर्गांसाठी (SC, ST, NT, DT, अपंग, माजी सैनिक इ.) घरे राखीव असतात. एकूण १५ वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी हे आरक्षण असतं. पण सध्या एक वेगळंच चित्र समोर येत आहे, जे घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

नेमकं काय घडलंय?

गेल्या काही काळापासून म्हाडाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) बांधली गेलेली अनेक घरे पडून आहेत. विशेषतः अनुसूचित जाती (SC), जमाती (ST) आणि भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी (NT/DT) राखीव असलेली घरे घेण्यास उमेदवार पुढे येत नसल्याने ही घरे रिकामीच राहत आहेत.

घरे विक्रीविना पडून राहिल्यामुळे म्हाडाचा मोठा निधी यात अडकून पडला आहे. त्यामुळे आता ही राखीव प्रवर्गातील घरे ‘खुल्या प्रवर्गासाठी’ (General Category) खुली करावीत, असा विचार म्हाडा स्तरावर गांभीर्याने सुरू आहे आणि लवकरच याबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. २३ डिसेंबर २०२५ च्या ‘सकाळ’ वृत्तपत्रानेही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

येथे वाचा – पुणे म्हाडा सोडतीवर मोठी बातमी! …आठवड्याभरात सोडत..

घरे रिकामी का राहत आहेत?

यामागे काही तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी आहेत:
१. कडक नियम: PMAY योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा (६ लाखांपेक्षा कमी) आणि भारतभर कुठेही स्वतःचं घर नसण्याची अट, हे नियम अनेकदा ग्राहकांसाठी अडथळा ठरतात.
२. अपेक्षित प्रतिसाद नाही: ज्या प्रवर्गासाठी घरे राखीव आहेत, त्यांच्याकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने घरं तशीच पडून आहेत.

येथे वाचा – MHADA पुणे लॉटरी अंतिम यादी जाहीर! डाऊनलोड करा 2 मिनिटांत..

ही घरे नेमकी कोणत्या भागात आहेत?

म्हाडाचे हे प्रधानमंत्री आवास योजनेतील (PMAY) प्रकल्प प्रामुख्याने भंडारली, गोठेघर, खोणी, शिरढोण आणि बोळी या ठिकाणी आहेत. हे सर्व परिसर ठाणे आणि मुंबईच्या मुख्य शहरांपासून थोडे अंतरावर म्हणजेच विकसनशील पट्ट्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात सध्या दळणवळणाच्या (Connectivity) पुरेशा सोयी आणि मूलभूत भौतिक सुविधांची काहीशी कमतरता जाणवते. त्यामुळेच, जरी ही घरे ‘परवडणाऱ्या’ श्रेणीत असली, तरी तिथल्या अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे आणि लोकेशनच्या दुर्गमतेमुळे सर्वसामान्य ग्राहक इथे घर घेण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. जोपर्यंत या लोकेशन्सवर रस्ते आणि ट्रान्सपोर्टची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत घरांची मागणी वाढणे कठीण असल्याचे दिसते.

रिॲलिटी चेक..

फक्त आरक्षित घरेच नाही, तर भंडार्ली, गोठेघर, खोणी, शिरढोण आणि बोळी यांसारख्या ठिकाणची खुल्या प्रवर्गातील हजारो घरे सुद्धा विक्रीविना पडून आहेत. दरवर्षीच्या जाहिरातीत ही घरे पुन्हा पुन्हा विक्रीस काढावी लागत आहेत.
याचाच अर्थ, केवळ आरक्षण हेच कारण नसून, इतरही काही गंभीर कारणं आहेत ज्याचा विचार म्हाडाने करणे गरजेचे आहे:
सुविधांचा अभाव: या प्रकल्पांच्या ठिकाणी अजूनही पुरेशा भौतिक सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत.
दळणवळणाची समस्या: ट्रान्सपोर्ट किंवा कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळे लोक इथे राहायला येण्यास कचरत आहेत.
किंमत: या ठिकाणच्या खाजगी घरांच्या किंवा तिथल्या मार्केट रेटच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती बऱ्याचदा जास्त वाटतात.

जर नवी मुंबई किंवा ठाण्यातील घरांना लोकांचा जास्त रिस्पॉन्स असतो, मग खोणी किंवा भंडार्लीच्या घरांना का नाही? याचं उत्तर फक्त ‘आरक्षण’ नसून ‘डेव्हलपमेंट’ मध्ये आहे. शासनाने आरक्षित घरे खुली करण्याचा निर्णय घेतला तर स्वागतच आहे, पण त्याचसोबत त्या भागात रस्ते, पाणी आणि ट्रान्सपोर्ट यांसारख्या सुविधांवर भर दिला, तरच खऱ्या अर्थाने घरांची विक्री वाढेल.

Leave a Comment

Join WhatsApp Group