सध्या सर्वत्र कांद्याच्या बाजाराचीच चर्चा आहे. कधी भाव वाढतोय, तर कधी धडमदिशी खाली पडतोय. आपण शेतात राबराब राबतो, महागडी खतं आणि औषधं वापरून कांदा पिकवतो. पण जेव्हा हाच सोन्यासारखा कांदा मार्केटमध्ये नेतो, तेव्हा अपेक्षित भाव न मिळाल्याने आपल्या काळजाचं पाणी होतं.
पण मित्रांनो, अनेकदा बाजारभाव कमी मिळण्यामागे फक्त मार्केटची स्थितीच नाही, तर आपली एक छोटीशी चूकही कारणीभूत असू शकते. ती म्हणजे ‘कांद्याची अयोग्य निवड किंवा ग्रेडिंग’.. आपल्याला कांदा ‘पिकवता’ येतो, पण तो हुशारीने ‘विकता’ आला पाहिजे. चला तर मग, आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया की, कांद्याची विक्री करताना अशी कोणती काळजी घ्यावी ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल.
व्यापारी भाव कसा ठरवतात? (व्यापाऱ्यांचे गणित समजून घ्या)
जेव्हा आपण कांद्याच्या गोण्या मार्केटमध्ये नेतो, तेव्हा व्यापारी प्रत्येक गोणी तपासून पाहत नाही. ते म्हणतात ना, “शितावरून भाताची परीक्षा!” अगदी तसेच, ते लिलावासाठी एखाद-दुसरी गोणी फोडतात. जर त्या गोणीत मोठ्या कांद्यासोबत एखादा सडका, दुभाळका किंवा अगदी बारीक कांदा दिसला, तर व्यापारी संपूर्ण लॉटला त्याच नजरेने बघतो. तुमच्या ९०% चांगल्या कांद्याचा भाव, त्या १०% खराब किंवा मिक्स कांद्यामुळे पडतो. इथेच आपलं प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांचं नुकसान होतं.
येथे वाचा – खुशखबर! या दिवशी जमा होणार 22वा हप्ता.. पहा तारीख आणि महत्त्वाची माहिती..
ग्रेडिंगची योग्य पद्धत: तीन टप्प्यांत करा वर्गीकरण
बाजारात नेण्यापूर्वी कांद्याची प्रतवारी (Sorting/Grading) करणे अत्यंत गरजेचे आहे. ती खालीलप्रमाणे करावी:
१. पहिली पायरी: खराब कांदा बाजूला करा
सगळ्यात आधी सडका, डागी किंवा दुभाळका (जुळा) कांदा वेगळा काढा. हा कांदा चांगल्या मालात मिक्स झाल्यास चांगल्या कांद्यालाही सडवू शकतो आणि भावही पाडतो.
२. दुसरी पायरी: तीन प्रकारात विभागणी
उरलेल्या चांगल्या कांद्याचे आकारानुसार तीन भाग करा:
एक नंबर (Grade 1): हा तुमचा ‘सुपर क्वालिटी’चा मोठा कांदा असेल.
दोन नंबर (Grade 2): मध्यम आकाराचा कांदा.
तीन नंबर (Grade 3): बारीक किंवा ज्याला आपण ‘भुगी’ म्हणतो.
याचा फायदा काय होईल?
समजा, तुमच्याकडे एकूण ५० गोण्या माल आहे. जर तुम्ही तो तसाच मिक्स विकला, तर व्यापारी तुम्हाला सरासरी किंवा कमी भाव देतील.
पण जर तुम्ही ग्रेडिंग केले आणि ३० गोण्या ‘एक नंबर’ मालाच्या, १५ गोण्या ‘दोन नंबर’च्या आणि ५ गोण्या ‘बारीक’ मालाच्या भरल्या, तर काय होईल?
तुमचा ३० गोण्या माल हा टॉप रेटने विकला जाईल.
दोन नंबरचा माल मध्यम भावाने जाईल.
फक्त उरलेल्या ५ गोण्यांना कमी भाव मिळेल.
येथे वाचा – कापूस भाव जानेवारीत वाढणार की पडणार? शेतकऱ्यांनी काय करावे?
जर हे सगळं एकत्र असतं, तर त्या ५ गोण्यांमुळे तुमच्या चांगल्या ३० गोण्यांचाही भाव पडला असता. थोडक्यात काय, तर दोन गोण्या कमी भरल्या तरी चालतील, पण मालाची क्वालिटी एकसारखी ठेवा.
जाता जाता… शेतकरी मित्रांनो, हे वर्ष आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. पावसाने नुकसान केले आहे आणि उत्पादन घटले आहे. त्यामुळे आपल्या हाती जो काही माल आला आहे, तो योग्य पद्धतीने आणि हुशारीने विकणे गरजेचे आहे. कांद्याची योग्य सॉर्टिंग करा, सडका माल वाळवून नंतर विका किंवा हॉटेल व्यवसायासाठी वेगळा द्या, पण तो चांगल्या मालात मिसळू नका. तुमची ही थोडीशी मेहनत तुमच्या खिशात चार पैसे नक्कीच जास्त पाडेल.
येथे वाचा – थेट बँक खात्यात 2 लाख! शेतकरी सानुग्रह योजना आता ‘महाडीबीटी’वर.. पहा अर्ज कसा करायचा?