शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात तुमचं हिरवंगार हरभऱ्याचं रान पाहिलं की मनाला वेगळंच समाधान मिळतं, नाही का? पिकाची वाढ जोरात सुरू असते, फुलं लागण्याची वेळ जवळ येत असते… आणि अचानक एक दिवस शेतात फेरफटका मारताना काही ठिकाणी पिवळी पडलेली, मान टाकलेली झाडं दिसतात. हे पाहून काळजात धस्स होतं!
आपल्या कष्टाच्या पिकावर ‘मर रोगा’ने (Fusarium Wilt) आक्रमण तर नाही ना केलं? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? काळजी करू नका! हा रोग नेमका का येतो आणि तो येऊ नये म्हणून किंवा आल्यावर काय उपाय करायचे, याची ‘A to Z’ माहिती आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत. चला तर मग, आपल्या हरभऱ्याला वाचवूया!
हरभऱ्यातील ‘मर रोग’ (Wilt) नेमका आहे तरी काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर, हा रोग ‘फ्युझेरियम’ (Fusarium) नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीत आधीपासूनच लपून बसलेली असते. जेव्हा तिला पोषक वातावरण मिळतं, तेव्हा ती पिकाच्या मुळांवर हल्ला करते.
हरभऱ्यातील मर रोग कसा ओळखायचा?
१.सुरुवातीला जमिनीलगतची पाने पिवळी पडतात.
२.हळूहळू झाड पूर्णपणे सुकून जातं (जसं काही त्याला पाणीच मिळालं नाही).
३.सर्वात खात्रीशीर खूण: एखादं मरलेलं झाड उपटा आणि त्याच्या मुळाचा किंवा खोडाचा उभा काप घ्या. जर आतमध्ये काळी किंवा विटकरी रंगाची रेष दिसली, तर समजा ‘मर रोग’ आलाच!
येथे वाचा – अर्ध्या खर्चात वांग्याची शेती; ही ट्रिक बनवेल मालामाल..
पाणी दिल्याने मर रोग वाढतो का? (एक गैरसमज)
बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की पाणी जास्त झाल्यामुळे मर रोग येतो. पण हे अर्धसत्य आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार, फक्त पाण्यामुळे मर येत नाही. जेव्हा जमिनीत ओलावा (आद्रता) जास्त असतो आणि त्याचवेळी वातावरण उष्ण (तापमान जास्त) असतं, तेव्हा ही बुरशी वेगाने वाढते. कडक थंडीत मर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना ‘वापसा’ स्थिती (Field Capacity) जपणं खूप महत्त्वाचं आहे.
मर रोग येऊच नये म्हणून काय कराल? (प्रतिबंधात्मक उपाय)
रोग आल्यावर धावपळ करण्यापेक्षा तो येऊच नये म्हणून काळजी घेणं कधीही चांगलं!
१. उन्हाळी मशागत (Best Trick): उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्या. यामुळे जमिनीत लपलेली बुरशी उन्हाच्या उष्णतेने नष्ट होते.
२. पीक फेरपालट (Crop Rotation): दरवर्षी त्याच जमिनीत हरभरा घेऊ नका. मध्ये एक वर्ष ‘ज्वारी’ सारखं पीक घ्या. ज्वारीच्या मुळांमुळे जमिनीत असे काही बदल होतात की ही बुरशी तिथे टिकू शकत नाही.
३. वाण निवड: शक्यतो ‘जॅकी 9218’ सारख्या मर रोगाला प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निवड करा.
येथे वाचा – अर्ध्या खर्चात वांग्याची शेती; ही ट्रिक बनवेल मालामाल..
सर्वात महत्वाचे: बीज प्रक्रिया
शेतकरी दादांनो, पेरणीच्या घाईत बीज प्रक्रिया करायला विसरू नका. हे आपल्या पिकाचं ‘सुरक्षा कवच’ आहे.
१.जैविक उपाय: ३ ग्रॅम ट्रायकोडर्मा (Trichoderma) प्रति किलो बियाण्याला चोळा आणि सावलीत सुकवा. (जमिनीत ओलावा चांगला असेल तर याचा रिझल्ट भारी येतो).
२.रासायनिक उपाय: जर रासायनिक वापरायचं असेल तर, कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (२ ते २.५ ग्रॅम) किंवा कार्बोक्सिन + थायरम (२.५ ते ३ ग्रॅम) प्रति किलो बियाण्याला वापरू शकता.
येथे वाचा – मिरचीने दिला शेतीला नवा स्वाद; 40 गुंठ्यांतून 12 लाखांचे उत्पन्न..
पीक उभं असताना मर रोग दिसला तर काय करावं?
जर तुम्हाला शेतात तुरळक ठिकाणी मर रोगाची झाडं दिसली (१०-१५% पेक्षा कमी प्रादुर्भाव), तर लगेच खालील उपाय करा:
१. खतांसोबत बुरशीनाशक:
पाणी देण्याआधी युरिया किंवा इतर खतांमध्ये कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून जमिनीत फेका आणि मग पाणी द्या. यामुळे मुळांच्या कक्षेतील बुरशीला आळा बसेल.
२. फवारणीचे नियोजन:
मर रोग दिसताच आंतरप्रवाही बुरशीनाशकाची (उदा. टेब्युकोनॅझोल किंवा थायोफिनेट मिथाईल) फवारणी घ्या.
एक खास टीप (Pro Tip):
फवारणी सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान करा. का? कारण सकाळी पानांवर दव असतं. औषध पानांवर पडलं की दवाच्या पाण्यासोबत ते ओघळून खाली मुळांपर्यंत जातं. म्हणजे पानांवाटे आणि मुळांवाटे असा ‘दुहेरी फायदा’ मिळतो. हरभऱ्याचा मर रोग भयानक असला तरी योग्य नियोजनाने आपण त्याला नक्कीच हरवू शकतो. बीज प्रक्रिया, पाण्याचे योग्य नियोजन आणि वेळीच फवारणी केली तर आपलं उत्पादन कुठेच गेलं नाही!
महत्वाचे : कोणतीही फवारणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा..