मिरचीने दिला शेतीला नवा स्वाद; 40 गुंठ्यांतून 12 लाखांचे उत्पन्न..

Farmer Success Story : अतिवृष्टीमुळे शेती अडचणीत आली असतानाही हार न मानता नियोजनबद्ध आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून सेलू तालुक्यातील हिस्सी गावचे शेतकरी भास्कर भगवानराव गात यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. अवघ्या ४० गुंठे क्षेत्रात हिरव्या मिरचीचे तब्बल ३०० क्विंटल उत्पादन घेत त्यांनी कमी क्षेत्रातही मोठे उत्पन्न शक्य आहे, हे प्रत्यक्षात दाखवून दिले आहे.

जून महिन्यात भास्कर गात यांनी सुमारे ३ हजार मिरची रोपांची लागवड केली. पिकाच्या वाढीदरम्यान संतुलित खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रणासाठी योग्य औषधांचा वापर, वेळोवेळी मशागत आणि पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने मिरची पीक जोमाने फोफावले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च आला.

मिरचीतून उत्पादन भरघोस

मिरचीची तोडणी अद्याप सुरू असली तरी आतापर्यंत सुमारे ३०० क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन हाती आले आहे. बाजारात सरासरी ४० रुपये किलो दर मिळाल्याने सुमारे १२ लाख रुपयांची विक्री झाली असून, खर्च वजा जाता जवळपास ८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याची माहिती भास्कर गात यांनी दिली.

ग्रामीण महिलांना रोजगार

मिरचीच्या तोडणीसाठी स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेती उत्पन्नासोबतच गावातील रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे. तोडणी अंतिम टप्प्यात असल्याने उर्वरित उत्पादनातून आणखी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

येथे वाचा – लासलगावात कांद्याचे दर बदलले; पहा कांदा नगरीतील भाव..

बाजाराभिमुख शेतीचा यशस्वी प्रयोग

पारंपरिक पिकांऐवजी बाजारातील मागणी, उपलब्धता आणि भावाचा अंदाज घेऊन मिरचीची निवड केल्याचे भास्कर गात सांगतात. योग्य नियोजन केले तर कमी क्षेत्रातही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हा त्यांचा अनुभव आहे.

इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक कहाणी

अतिवृष्टीसारख्या संकटातून मार्ग काढत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि बाजाराभिमुख दृष्टिकोन स्वीकारल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते, हे या यशकथेतून अधोरेखित होते. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि चांगला दर मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कथा निश्चितच प्रेरणादायी आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group