Onion Cultivation New Formula : उन्हाळी कांदा लागवडीचं नवं सूत्र; योग्य तंत्र वापरा, उत्पादन वाढवा आणि नास टाळा : राज्यात सध्या उन्हाळी कांद्याच्या पुनर्लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात योग्य पद्धतीने लागवड केली, तर कांद्याचं उत्पादन भरघोस मिळू शकतं. मात्र हवामानातील अनिश्चितता, रोगांचा प्रादुर्भाव, अपुरी तांत्रिक माहिती, चुकीचं खत व पाणी नियोजन आणि काढणी-साठवणुकीतील त्रुटी यांमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे उन्हाळी कांद्याची लागवड सुधारित तंत्राने केल्यास उत्पादनात वाढ होतेच, शिवाय कांद्याचा नासही लक्षणीयरीत्या कमी करता येतो.
उन्हाळी कांद्याचे सुधारित वाण
उन्हाळी कांद्याची रोपवाटिका साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये तयार केली जाते, तर रोपांची पुनर्लागवड डिसेंबर- जानेवारी महिन्यात होते. या हंगामासाठी N-2-4-1 हा वाण विशेषतः उपयुक्त मानला जातो. याशिवाय अॅग्रीफाउंड लाईट रेड, अर्का निकेतन, भीमा किरण आणि भीमा शक्ती हे वाणही चांगल्या उत्पादनासाठी शिफारस करण्यात येतात.
जमीन निवड आणि पूर्वमशागत
उन्हाळी कांद्यासाठी मध्यम ते मध्यम भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जमिनीत वाळूचं प्रमाण जास्त आणि सेंद्रिय घटक मुबलक असावेत. मशागत करताना मध्यम खोल नांगरणी करावी, कारण कांद्याची मुळे साधारण ५ ते ६ सें.मी. खोलवर वाढतात. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी.
येथे वाचा – जानेवारीत तुरीचे भाव वाढणार की पडणार? हमीभाव 8 हजार… पण तुरीला मिळतोय हा भाव…
सुधारित लागवड पद्धत : गादीवाफा
पारंपरिक सपाट वाफ्यांऐवजी गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढ होते.
वाफ्याचा आकार : १२० सें.मी. रुंद आणि १५ सें.मी. उंच
ठिबक सिंचन : प्रत्येक वाफ्यावर दोन लॅटरल नळ्या असाव्यात
या पद्धतीमुळे सुमारे ६०% पाण्याची बचत होते. पाण्याचा योग्य निचरा झाल्याने कांद्याचा आकार गोल, आकर्षक होतो आणि मूळकुज व सड यांसारख्या रोगांचा धोका कमी होतो.
खत आणि पाणी व्यवस्थापन
पुनर्लागवडीपूर्वी प्रति हेक्टर ४० ते ५० बैलगाड्या शेणखत वापरण्याची शिफारस आहे. रासायनिक खतांमध्ये हेक्टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश द्यावा. लागवडीच्या वेळी नत्राचा अर्धा हप्ता आणि स्फुरद-पालाश पूर्ण प्रमाणात द्यावा.
जैविक खतांमध्ये अझोस्पिरीलम व अझोटोबॅक्टर (१५०० ग्रॅम/हेक्टर) वापरल्यास नत्राच्या खतामध्ये २५ ते ५० टक्के बचत करता येते.
पाणी व्यवस्थापनाबाबत, हवामानानुसार ६ ते ८ दिवसांच्या अंतराने एकूण १५ ते २० पाळ्या द्याव्या लागतात. मात्र काढणीच्या साधारण तीन आठवडे आधी पाणी पूर्णपणे बंद करणे अत्यंत आवश्यक आहे.
येथे वाचा – या दिवशी गारपीट आणि अवकाळी पाऊस; पंजाब डख यांचा 2026 चा मोठा अंदाज..
तण नियंत्रण कसे करावे?
उन्हाळी कांद्यात तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर अशा दोन टप्प्यांत तणनाशकांचा वापर करावा.
लागवडीपूर्वी : पेंडीमिथिलीन (२.५ ते ३.५ लिटर) किंवा गोल (०.६ ते १ लिटर) ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
लागवडीनंतर : ३ ते ४ पानांच्या अवस्थेत टर्गा सुपर तणनाशकाचा वापर
काढणी आणि साठवणूक
जेव्हा सुमारे ५० टक्के झाडांच्या माना पडतात, तेव्हा कांदा काढणीस तयार झाला असं समजावं. काढणीनंतर कांदा शेतातच ५ दिवस मानांनी झाकून वाळवावा. त्यानंतर ३ ते ५ सें.मी. मान ठेवून पात कापावी.
साठवणुकीपूर्वी कांदा सावलीत किमान दोन आठवडे चांगला सुकवावा. पूर्णपणे सुकल्यानंतरच मध्यम आकाराच्या कांद्याची साठवणूक केल्यास उन्हाळी कांदा जास्त काळ टिकतो आणि नुकसान टाळता येते.
महत्वाचे : खत व्यवस्थापन व फवारणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा..