Mhada Rental Homes 2025 : पुणे, मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं घर असावं, हे स्वप्न आजही अनेकांच्या मनात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांसाठी घर खरेदी करणं अधिकच कठीण झालं आहे. त्यामुळेच अनेकजण म्हाडाच्या घरांकडे आशेने पाहतात किंवा लॉटरीच्या प्रतीक्षेत राहतात. अशातच म्हाडाकडून एक दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे.
भाड्याच्या घरांसाठी स्वतंत्र धोरण
मुंबई आणि उपनगरांमध्ये नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा उपचारासाठी रोज मोठ्या प्रमाणावर लोक येतात. मात्र परवडणारी भाड्याची घरे मिळवणं ही मोठी डोकेदुखी ठरते. हीच अडचण लक्षात घेऊन म्हाडाने भाडेतत्त्वावरील घरांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार, घरांची विक्री करण्यासोबतच लवकरच म्हाडाकडून भाड्यानेही घरे उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट घर मिळणार
राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली हे धोरण आकार घेत असून, त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचाही निर्णय झाला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना थेट म्हाडाची भाड्याची घरे मिळू शकणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या भागांत घर खरेदी परवडत नसलेल्या नोकरदार, विद्यार्थी आणि स्थलांतरितांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
कसे असणार भाडे?
म्हाडाच्या भाडेतत्त्वावरील घरांसाठी आकारले जाणारे भाडे हे खाजगी बाजारापेक्षा कमी, परवडणारे आणि उत्पन्न गटानुसार ठरवले जाण्याची शक्यता आहे. भाडे निश्चित करताना परिसर, घराचा प्रकार, चौरसफूट क्षेत्रफळ आणि संबंधित उत्पन्न गट हे निकष लक्षात घेतले जाऊ शकते. त्यामुळे अवाजवी दर, अचानक भाडेवाढ किंवा मनमानी आकारणीला आळा बसणार आहे. खाजगी भाडे बाजारातील जास्त दर आणि कडक अटींमुळे होणाऱ्या अडचणीही यामुळे कमी होण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या घरांचे भाडे खाजगी बाजारापेक्षा कमीच असतील.
येथे वाचा – पुणेकरांसाठी घरांची बंपर लॉटरी! घरासाठी 2.50 लाखांचे अनुदान, या तारखेपासून करा अर्ज..
विक्रीविना पडलेली घरे भाड्याने देण्याची शक्यता
दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरे उभारण्यात आली आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळानेही या योजनेतून हजारो घरे बांधली आहेत. मात्र उत्पन्न मर्यादा आणि ‘देशात अन्यत्र घर नसावे’ अशा अटींमुळे सुमारे ५२ हजारांहून अधिक घरे अद्याप विक्रीविना पडून आहेत. हीच घरे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
येथे वाचा – कागदपत्रे रेडी ठेवा! नवी मुंबईत ‘या’ दिवशी सिडकोची मोठी लॉटरी..