Pune Housing : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे! स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सरकारकडून घरांसाठी बंपर लॉटरी जाहीर करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांना थेट 2.50 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ठराविक तारखेपासून सुरू होणार असून, मर्यादित कालावधीसाठीच ही संधी उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात स्वतःचे घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीएमआरडीएने एकूण ८३३ घरांची मोठी ऑनलाईन सोडत जाहीर केली असून, ही सोडत अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी असणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत नोंदणीपासून अर्ज आणि पेमेंटपर्यंत सर्व काही पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
या सोडतीमध्ये पेठ क्रमांक १२ येथे एकूण ३४० घरे उपलब्ध असून, त्यापैकी ५५ घरे EWS आणि २८५ घरे LIG गटासाठी राखीव आहेत. पेठ क्रमांक १२ मधील अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.५० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे, ही बाब विशेष महत्त्वाची ठरते. याशिवाय पेठ क्रमांक ३०-३२ येथे उर्वरित ४९३ घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामध्ये ३०६ घरे EWS आणि १८७ घरे LIG गटासाठी आहेत.
या तारखेपासून करा अर्ज
सोडतीसाठीची ऑनलाईन नोंदणी सोमवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज भरणे आणि पेमेंट प्रक्रिया शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. अर्जदारांना नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून, ऑनलाईन पेमेंटची अंतिम वेळ २७ जानेवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असेल. तसेच RTGS किंवा NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
येथे वाचा – कागदपत्रे रेडी ठेवा! नवी मुंबईत ‘या’ दिवशी सिडकोची मोठी लॉटरी..
सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांची प्रारूप यादी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार असून, अंतिम यादी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर केली जाईल. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन सोडत काढली जाणार असून, याच दिवशी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदार आणि प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची नावे पीएमआरडीएच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.
येथे वाचा – घरांची लॉटरी लागली; मुंबईत BMC च्या लॉटरीत ही लोकं विजेते..
इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी housing.pmrda.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. तसेच जाहिरातीत नमूद केलेल्या योजना आणि सदनिकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार महानगर आयुक्त, पीएमआरडीए यांच्याकडे राखीव असल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.