दुष्काळ मदत 7 कागदपत्रे

१. आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल लिंक असणे
कोणतीही शासकीय मदत आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा होते. यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला आणि चालू मोबाईल नंबरला लिंक असणे ही सर्वात बेसिक आणि महत्त्वाची अट आहे. जर तुमचे हे लिंकिंग झालेले नसेल, तर आजच बँकेत जाऊन ते पूर्ण करा.

२. ई-पीक पाहणी (E-Pik Pahani) आणि पीक विमा पावत्या
तुमच्या जमिनीवर नक्की कोणते पीक होते आणि त्याचे किती नुकसान झाले आहे, हे शासनाला ‘ई-पीक पाहणी’वरूनच समजते. त्यामुळे ई-पीक पाहणी केलेली असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ती केली नसेल, तर स्वतः मोबाईल ॲपवरून किंवा कृषी सहाय्यकाकडून ती करून घ्या. तसेच, जर तुम्ही पीक विमा भरला असेल, तर त्या विमा भरल्याच्या पावत्या सुरक्षित जपून ठेवा.

३. अपडेटेड फार्मर आयडी (Farmer ID)
येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मिळणारे कोणतेही अनुदान हे त्यांच्या ‘फार्मर आयडी’शी जोडलेले असणार आहे. पूर्वी कर्जमाफीच्या वेळी ज्यांचा फार्मर आयडी नव्हता, त्यांना ई-केवायसी (e-KYC) करताना खूप अडचणी आल्या होत्या. त्यामुळे तुमचा फार्मर आयडी बनलेला आहे की नाही? तो व्हेरिफाय झाला आहे का? त्यात सर्व गट नंबर जोडले आहेत का? याची खात्री नक्की करा.

४. सातबारा उतारा (7/12 Extract) आणि सामायिक क्षेत्र
प्रत्येक शेतकऱ्याकडे सातबारा असतोच, पण यात लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमची जमीन ‘वैयक्तिक’ आहे की ‘सामायिक’. जर क्षेत्र सामायिक असेल, तर पंचनामा करताना इतर खातेदारांच्या संमतीपत्राची गरज भासू शकते. नुकसान भरपाई नक्की कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात द्यायची, हे ठरवण्यासाठी सातबाऱ्यावरील नोंदी आणि संमतीपत्र खूप महत्त्वाचे ठरते.

५. वैयक्तिक पंचनामे (Panchnama)
केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता शेतकऱ्यांचे वैयक्तिक पंचनामे केले जाणार आहेत आणि त्यावर शेतकऱ्यांच्या सह्या देखील घेतल्या जातील. त्यामुळे तुमच्या शेताचा, पिकांचा आणि दुष्काळाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडून व्यवस्थित झाला आहे, याची खात्री करा. हा अहवाल पुढे तहसील आणि जिल्हा स्तरावर पाठवला जातो, ज्यावर तुमची मदत ठरते.

६. पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव तपासणे
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त आणि बाधित क्षेत्राची आकडेवारी गोळा केली जाते. या आधारे शासनाकडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या (Beneficiary Lists) जाहीर केल्या जातात. या याद्या गावच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीत आल्यावर त्यामध्ये तुमचे नाव असल्याची आवर्जून खात्री करा.

७. ई-केवायसी पूर्ण करणे (e-KYC)
सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ई-केवायसी! यादीत नाव आल्यानंतर शासनाकडून अनुदान वाटपापूर्वी केवायसी करण्याचे आवाहन केले जाते. तुम्ही यापूर्वी केवायसी केली असली, तरी नव्या मदतीसाठी पुन्हा केवायसी करावी लागू शकते. ई-केवायसी केल्याशिवाय शासनाचे पैसे खात्यात वर्ग होत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा.

थोडक्यात सांगायचे तर.. आधार-बँक लिंकिंग, ई-पीक पाहणी, अपडेटेड फार्मर आयडी, अचूक सातबारा, पंचनामा, यादीतील नाव आणि वेळेवर केलेली ई-केवायसी – या ७ गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील, तर दुष्काळी मदत मिळण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.