खरीप हंगाम २०२५ च्या पीकविम्याचे आकडे आता शेतकऱ्यांच्या मोबाईलवर झळकू लागले आहेत. काही शेतकऱ्यांना विम्याची मंजूर रक्कम दिसत आहे, काहींचे स्टेटस ‘प्रलंबित’ (Awaited) दाखवत आहे, तर काहींच्या खात्यात ‘शून्य’ रुपये दिसत आहेत. या संमिश्र परिस्थितीमुळे ‘आपल्या जिल्ह्याला किंवा तालुक्याला पीकविमा मिळणार की नाही?’ हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नुकत्याच समोर आलेल्या ‘उत्पादकता अहवालानुसार’ (Yield Base Data) राज्याच्या कोणत्या भागात विम्याची शक्यता आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
विमा मंजुरीचे मुख्य सूत्र: ‘उत्पादकता’
पीकविमा मिळणे हे प्रामुख्याने पीक कापणी प्रयोगातून निश्चित होणाऱ्या ‘उत्पादकतेवर’ (Yield) अवलंबून असते. चालू वर्षातील प्रति हेक्टरी उत्पादनाची तुलना मागील ५ वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी केली जाते. जर उत्पादनात मोठी घट झाली असेल, तरच पीकविम्याची रक्कम निश्चित केली जाते.
येथे वाचा – २०२६ संपूर्ण हवामान अंदाज, पहा कसा असणार खरीप हंगाम
कोणत्या पिकाला कुठे मिळणार विमा? (कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार)
१. सोयाबीन (राज्यातील प्रमुख पीक):
• येथे विम्याची दाट शक्यता: अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर (उत्पादन जवळपास निम्मे), धाराशिव, नांदेड (मोठी घट), परभणी, हिंगोली, बुलढाणा (५०% घट), अकोला, अमरावती, यवतमाळ (जवळपास ६०% घट), वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर (३० ते ३५% घट). वर्धा जिल्ह्यात तर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिसायलाही सुरुवात झाली आहे.
• येथे शक्यता कमी: नाशिक, धुळे, नंदुरबार (खानदेशात उत्पादनात घट नाही), पुणे, सातारा आणि सांगली. कोल्हापूरमध्ये तर यंदा उत्पादनात वाढ झाली असल्याने तिथे विमा मिळण्याची शक्यता नाही.
२. धान (भात):
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये धानाच्या उत्पादनात घट आहे. विशेषतः पालघरमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत (२५३४ किलोवरून १६४८ किलो) जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे या भागात धानाचा पीकविमा मिळण्याची चांगली शक्यता आहे.
३. बाजरी आणि उडीद:
• बाजरी: सोलापूरमध्ये उत्पादनात मोठी घसरण (६७७ किलोवरून ४०१ किलो) झाली असून, तिथे विम्याचे कॅल्क्युलेशन दिसत आहे. तसेच लातूर आणि नांदेडमध्येही बाजरीच्या उत्पादनात घट आहे.
• उडीद: वाशिम आणि बीडसारखे काही जिल्हे वगळता, राज्याच्या बहुतांश भागात उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने याचा विमा बऱ्याच ठिकाणी मिळू शकतो.
४. मका:
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे वगळता, राज्याच्या इतर कोणत्याही भागात मक्याच्या उत्पादनात घट नोंदवली गेलेली नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांत मक्याचा विमा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
येथे वाचा – खाद्यतेलाचे दर वाढले; आता 5 लिटरच्या कॅनची किंमत किती?
महसूल मंडळानुसार बदलू शकते गणित!
कृषी तज्ज्ञांच्या मते, वर दिलेली आकडेवारी ही जिल्हास्तरीय सरासरी आहे. मात्र, पीकविम्याचे अंतिम वाटप हे ‘महसूल मंडळ’ पातळीवर होते. एखाद्या जिल्ह्यामध्ये ५०% घट दिसत असली, तरी एखाद्या विशिष्ट महसूल मंडळात पाऊस चांगला होऊन उत्पादकता वाढलेली असू शकते किंवा याउलटही घडू शकते.
शेतकऱ्यांनी केवळ जिल्ह्याच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता, पोर्टलवर जाऊन आपला वैयक्तिक क्लेम मंजूर झाला आहे की नाही, हे तपासून पाहणे आवश्यक आहे. या उत्पादकतेची सविस्तर यादी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर (कृषी महाराष्ट्र) उपलब्ध आहे.